Sinhgad Road
Sinhgad Road Tendernama
पुणे

Pune: सिंहगड रोडवर एखाद्याचा जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : सिंहगड रस्त्यावरील (Sinhgad Road) राजारामपूल ते माणिकबाग (Rajaram Bridge To Manikbagh Flyover) दरम्यान होणाऱ्या उड्डाणपुलाचे काम सध्या सुरू आहे.

पुलासाठी खोदलेले खिळे, गज तसेच आहेत, परिणामी त्यात दुचाकी वाहने अडकून अपघातांच्या घटना वाढत आहे. यातून वाहनचालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. मुळातच वाहतूक कोंडीने हैराण झालेले नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महापालिकेने योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांनी मागणी केली आहे.

उड्डाण पुलाच्या कामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दोन आठवड्यांपूर्वी एका व्यक्तीच्या अंगावर लोखंडी गज पडून अपघात झाला होता. ही घटना ताजी असतानाच रस्त्यावरील खड्ड्यात पडून एक ज्येष्ठ नागरिक गंभीर झाले होते. तरीही प्रशासनाकडून यावर कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. मुख्य रस्त्याच्या बाजूला म्हणजेच साइड पट्ट्यांलगत असलेले खड्डे अद्यापही बुजविले गेले नाही, त्यामुळेही नियमीत किरकोळ स्वरूपाचे अपघात होत आहेत.

राजाराम पूल ते माणिकबाग दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजूला समतल रस्ता नाही. रस्त्याच्या कामासाठी ठिकठिकाणी ठोकलेले खिळे, गज अद्यापही रस्त्यात असल्याने वाहन चालवण्यासोबतच पादचाऱ्यांना चालणेदेखील अवघड झाले आहे, राजाराम पुलाशेजारील बस थांबा आणि रिक्षा थांबा अद्यापही हलवला नसल्याने वाहतूक कोंडीस नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यावर त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

त्या पत्राला केराची टोपली...
माजी नगरसेविका ज्योती गोसावी यांनी जुलै २०२२ मध्ये रस्त्याच्या कामाबाबत प्रशासनाला पत्र दिले होते. त्या पत्रानुसार रस्त्याच्या साइड पट्ट्या तसेच मुख्य रस्त्याला पडलेले खड्डे बुजून घेणे, राजाराम पूल ते धायरी फाटा दरम्यानच्या रस्त्यावर असलेल्या मोठ्या भेगा भरून घेणे, सिंहगड रस्ता समपातळीत करणे, पावसाळी जाळ्या नीट करणे यांसह विविध मागण्या महापालिकेकडे करण्यात आल्या होत्या, त्यावर देखील अद्याप कोणतेही काम झाले नाही.