Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : का? का? का?... का केले चांदणी चौकाचे उद्घाटन?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील (Chandani Chowk) वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून सतरा किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यास प्रारंभ केला, मात्र अद्यापही याचे काम अपूर्ण आहे. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय होत आहे.

मुख्य रस्ता वगळता अन्य रस्त्यांवर मार्गदर्शक फलक नाहीत. त्यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडतो आहे. वेद भवन जवळ भुयारी मार्गाचे काम सुरू आहे. महत्त्वाची कामे अजून पूर्ण झाली नसताना उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची घाई का करण्यात आली, असा सवाल नाराज नागरिक विचारत आहेत.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आठ रॅम्प, दोन सेवा रस्ते, दोन भुयारी मार्ग, चार पूल आणि १७ किलोमीटरचे रस्ते बांधण्याचा प्रकल्प हाती घेतला. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते १२ ऑगस्ट रोजी चांदणी चौक उड्डाणपुलाचे उद्घाटन झाले. मात्र मार्गदर्शक फलक नसल्याने कोणता रस्ता कुठे जातो हेच वाहनचालकांना समजत नाही.

प्राधिकरणाने काही ठिकाणी लावलेले फलक वाहनचालकांच्या नजरेस न पडणारे आहेत, तर काही रस्त्यांजवळ अद्यापही फलक लावण्यात आलेले नाहीत. रस्ता चुकल्यावर वाहनचालकांना किमान दोन किलोमीटरचा फेरा पडतो. त्यामुळे त्यांचा वेळ, इंधन वाया जाते.

ही कामे अद्याप अपूर्ण...

- बावधन ते एनडीए पूल

- वेद भवन येथे भुयारी मार्गाचे काम सुरूच

- मुख्य रस्त्यावर पीएमपी व एसटी बस साठी 'बसथांबा' नाही

- पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी पादचारी पूल नाही

- लेनची माहिती देणारे फलक नाहीत.

चांदणी चौकातील कामे अद्यापही अपूर्णच आहेत. त्यामुळे वाहनचालकांची मोठी गैरसोय होत आहे. कामे अपूर्ण असताना प्रशासनाने उद्घाटनाची घाई का केली? यामुळे एखादा अपघात होऊ शकतो.

- प्रमित नाईक, नागरिक, पुणे