पुणे (Pune) : वारज्यातील डुक्कर खिंडीजवळ असणाऱ्या सेवा रस्त्यावरच एका व्यावसायिकाने चारचाकी वाहने विकण्यासाठी उभी केली आहेत. येथे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रवाशांना या वाहनांचा अडथळा होत आहे. त्यामुळे ही वाहने येथून हटवावीत, अशी मागणी नागरिक करत आहेत.
वारज्याहून चांदणी चौकाच्या दिशेने जाणाऱ्या डुक्करखिंडीच्या जवळच एका व्यावसायिकाने चारचाकी वाहने विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. मात्र, ही वाहने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणात उभी असल्याने पुढे मुळशी भाग तसेच, हिंजवडी, बावधन, कोथरूड या भागाकडे जाणाऱ्या नागरिकांना येथील वाहनांचा अडथळा होत आहे.
साधारणतः २० ते २५ वाहने रस्त्यावरच लावण्यात आली आहेत. व्यावसायिकाची आतील जागा पूर्णपणे वाहनाने भरल्यानंतर राहिलेली वाहने तसेच, विक्री होणाऱ्या वाहनांवर नागरिकांचे लक्ष जावे, म्हणून वाहने रस्त्यावरच लावण्यात आले आहे. मात्र, हा रस्ता दुहेरी असल्याने प्रवाशांना प्रवास करणे कठीण झाले आहे. त्यामुळे ही वाहने येथून हटवावीत, अशी मागणी येथील नागरिकांनी केली.
येथे लागत असलेल्या अवैद्य वाहनांवरती पोलिस पाठवून योग्य ती कारवाई केली जाईल.
- विक्रम मिसाळ, सहाय्यक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग