Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporation Tendernama
पुणे

Pune : नियमांचे मोडणाऱ्या 'त्या' व्यावसायिकाला पालिका का घालतेय पायघड्या?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : संभाजी पोलिस चौकीच्या मागे नदीपात्राला लागून असलेल्या जागेत नियमांचे उल्लंघन करून होर्डिंग्ज उभारण्यात आल्याचा प्रकार समोर आल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून संबंधित व्यावसायिकाला पायघड्या घातल्या जात आहेत. ही जागा महापालिकेची असूनही नियमावलीनुसार प्रस्ताव न मागविता संबंधित व्यावसायिकाला ११ महिन्यांसाठी ती भाडेतत्त्वावर देण्याचा खटाटोप सुरू आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या मागे तीन होर्डिंग्ज उभी करण्यात आली आहेत. असे करताना दोन होर्डिंग्जमध्ये प्रत्येकी एक मीटरचे अंतर न सोडणे, राडारोडा टाकणे, झाडे तोडणे असे प्रकार करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर होर्डिंग्जच्या कामाला स्थगिती देण्यात आली. तसेच जाहिरात प्रसिद्धीवर बंदी आणली आहे. या प्रकरणात कसबा-विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबितही करण्यात आले होते. मात्र होर्डिंग्जचा परवाना रद्द करूनही लोखंडी सांगडा महापालिकेने काढून टाकलेला नाही.

दरम्यान, ही जागा खासगी मालकीची असल्याचा दावा होर्डिंग्ज व्यावसायिकाने केला होता. मात्र महापालिकेच्या तपासणीत ही जागा महापालिकेच्या मालकीची असल्याचे समोर आले आहे. तरीही क्षेत्रीय कार्यालयाकडून संबंधित व्यावसायिकाला ११ महिने मुदतीत जागा भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्याची हालचाल सुरू करण्यात आली आहे.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ‘‘आमच्याकडे अद्याप याचा प्रस्ताव आलेला नाही. सर्व गोष्टी नियमात बसल्याशिवाय होर्डिंग्जला परवानगी दिली जाणार नाही.

लिलाव न करता जागा वाटप?

महापालिकेची जागा भाडेतत्त्वावर देताना जागा वाटप नियमावलीनुसार लिलाव करणे आवश्‍यक आहे. जो टेंडरधारक जास्त भाडे महापालिकेला देईल, त्याला जागा देणे आवश्‍यक आहे. पण या प्रक्रियेलाही फाटा मारण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे.