पुणे (Pune) : पुणे शहरातील रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढत आहे. वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांना वाहतुकीस बंदी घातली आहे, तरीही नियमांचे उल्लंघन केले जात आहे. पायाभूत सुविधांचा अभाव, धोकादायक रस्ते, अतिक्रमण आणि बेफाम वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचे मृत्यू होत आहेत. प्रशासनाने अपघात रोखण्यासह वाहतूक सुरक्षित करण्यासाठी वरवरची मलमपट्टी न करता ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. (Pune City Road Accidents News)
शहरातील नवले पुलाजवळ अपघात वाढले आहेत. नवले पुलाजवळील सेल्फी पॉइंटजवळ मंगळवारी ट्रकने तीन मोटारींना उडवले. त्यात सात ते आठ जण जखमी झाले. बुधवारी गंगाधाम चौकात ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला. अपघाताचे हे दुष्टचक्र थांबण्याची चिन्हे नाहीत. शहरात २०२३ मध्ये ९४१ प्राणांतिक अपघातांत ३५१ नागरिकांचे प्राण गेले. २०२४ मध्ये अपघातांचे प्रमाण ९९३ वर पोहोचले आणि ३४५ जण मृत्युमुखी पडले.
यावर्षी एप्रिलअखेर १८३ अपघातांमध्ये ७३ जणांचा मृत्यू झाला. गेल्या १५ दिवसांत शहरात ११ जण मृत्युमुखी पडले आहेत. यामध्ये तीन अल्पवयीन मुलांचाही समावेश आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या आकड्यांवरून वाहनचालकांची बेफिकिरी, महापालिका आणि पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रस्त्यावर ‘मौत का खेल’ सुरू असल्याचे दिसून येत आहे.
निष्काळजी प्रशासन
वाहतूक पोलिसांकडून एप्रिलअखेर झालेल्या कारवायांचा अभ्यास केला; तर गतवर्षीच्या तुलनेत नियमभंग करणाऱ्यांमध्ये तिपटीहून अधिक वाढ झाली आहे. ‘नो एंट्री’च्या उल्लंघनात तब्बल एक हजार ४०० टक्के वाढ, धोकादायकपणे वाहने चालविणे २१५ टक्के वाढ, मद्यधुंद वाहनचालकांत ३०८ टक्के वाढ झाली आहे; तर सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या दुपटीहून अधिक झाली आहे.
पोलिसांकडून कारवाई होत असूनही अपघात वाढत आहेत. अपघाताला बेशिस्त वाहनचालकांसह प्रशासनातील उदासीन, कामचुकार अधिकारीही तेवढेच जबाबदार आहेत, असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यामुळे शहरातील अपघातांची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांवरही निश्चित करण्याची वेळ आली आहे.
समन्वयाचा अभाव
वाहतूक सुधारण्यासाठी केवळ कारवाई पुरेशी नाही. महापालिका, ‘पीएमआरडीए’ने रस्त्यांची रचना, योग्य सिग्नल यंत्रणा, चुकीची वळणे, बंद पथदिवे आणि उड्डाणपुलांच्या कामांचा आढावा घेत उपाययोजना करण्याची गरज आहे.
महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी समन्वयाने सोलापूर रस्ता, नगर रस्त्यावर काही प्रमाणात वाहतुकीच्या सुरक्षिततेसाठी उपाययोजना केल्या. मात्र, पुन्हा समन्वयाच्या अभावामुळे अनेक रस्त्यांवरील सुधारणा करण्याची कामे रखडली आहेत. आता केवळ कारवाई नको; तर कृती आराखडा करून समन्वयाने उपाययोजना करण्याची गरज आहे.
गंगाधाम चौक परिसरात सकाळी सहा ते रात्री दहापर्यंत अवजड वाहतुकीला बंदी केली आहे. याबाबत पोलिस अधिकाऱ्यांना कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. या भागातील अवैध गोदाम, वाईन शॉपमुळे होणाऱ्या अडचणींबाबत कारवाई करण्यात येईल. या भागातील अतिक्रमणांवर कारवाई करण्याबाबत महापालिकेला सूचना दिल्या आहेत.
- अमितेश कुमार, पोलिस आयुक्त, पुणे