
पिंपरी (Pimpri) : काही दिवसांपूर्वी पीएमपीएमएल (PMPML) मंडळाने बस प्रवासात भाडेवाढ केली आहे. तुलनेने मेट्रोचे तिकीट कमी आणि प्रवासदेखील आरामदायी ठरत आहे. त्यामुळे भाडेवाढीनंतर प्रवासी आता मेट्रोकडे वळत असल्याचे आकडेवारीतून पुढे आले आहे.
पिंपरी ते रामवाडी मेट्रो स्टेशनपर्यंत पीएमपीने प्रवास केल्यास ५० रुपये मोजावे लागतात. याच मार्गावर मेट्रोने प्रवास केल्यास केवळ ३५ रुपये मोजावे लागत आहेत. शिवाय मेट्रोचा प्रवास जलद, वातानुकूलित, शाश्वत आणि सुरक्षित ठरतो आहे. पीएमपीच्या भाडेवाढीनंतर दहा दिवसांतच मेट्रोच्या दोन्ही मार्गिकांवर एक लाख ३६ हजार ४४९ प्रवासी संख्या वाढल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट झाले.
तूट वाढत असल्याचे कारण देत पीएमपी प्रशासनाने एक जूनपासून भाडेवाढ केली. तसेच दोन्ही महापालिका क्षेत्रांतील स्वतंत्र पास रद्द करुन एकच ७० रुपये आणि पीएमआरडीए हद्दीत १२० रुपयांचा पास १५० रुपये केला आहे. मासिक पासचे दरही वाढवले आहेत. यामुळे अनेक मार्गांवर २५ रुपयांचे प्रवासभाडे ५० रुपयांवर गेले आहे. पण, मेट्रोचे तिकीट मात्र त्यापेक्षा स्वस्त आहे.
पीएमपीने प्रवास करताना वाहतूक कोंडी, वेळेवर बस नाही, ब्रेक डाऊन, चालक व वाहकांचे उद्धट वर्तन, गर्दीत धक्के खात प्रवास, बस थांबे नसल्यामुळे प्रवाशांना उन्हा-पावसात उभे राहणे. तसेच नुकतीच झालेली दरवाढ या सर्वांपासून सुटका मिळण्यासाठी प्रवासी मेट्रोकडे वळत असल्याचे चित्र आहे. मेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट (पर्पल मार्गिका) आणि वनाज ते रामवाडी (ॲक्वा मार्गिका) या दोन्ही मार्गिकांवर हे प्रवासी वाढल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
मार्ग - मेट्रोचे दर - पीएमपीचे दर
पिंपरी ते स्वारगेट - ३० - ४०
पिंपरी ते रामवाडी - ३५ - ५०
पिंपरी ते नळस्टॉप - ३० - ४०
रामवाडी ते नळस्टॉप - २५ - ५०
मेट्रो प्रवासी संख्या
मार्ग - मे - जून
पिंपरी ते स्वारगेट - ६,७८,८५२ - ७,३६,५०५
वनाज ते रामवाडी - ८,१४,५४१ - ८,९३,३३७
एकूण - १४,९३,३९३ - १६,२९,८४२
(आकडेवारी कालावधी : एक ते दहा तारीख)