पुणे (Pune) : स्मार्ट सिटीच्या (Smart City) ठेकेदाराने (Contractor) निष्काळजीपणे खोदकाम केल्याने बाणेर, बालेवाडी परिसरातील जलवाहिन्या फुटल्याचा दावा महापालिकेने केला आहे. या दुरुस्तीचा २५ लाख रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीने ठेकेदाराकडून वसूल करावा अशी मागणीही पत्राद्वारे करण्यात आली. अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
या भागात अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. समान पाणी पुरवठा योजनेअंतर्गत प्राधान्याने या भागातील काम पूर्ण करत महापालिकेने मोठा गाजावाजा करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत योजनेचे उद्घाटन केले.
या योजनेअंतर्गत सन होरायझन सोसायटी आणि बालेवाडी जकात नाका येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या. एका वर्षापूर्वी या भागातील जलवाहिन्यांचे जाळे विस्तारण्यात आले. उद्घाटनानंतर महिनाभरात पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासनाने चाचण्या सुरू केल्या. त्यावेळी अनेक भागांत पाणीगळती सुरू असल्याचे दिसले.
जमिनीतून पाणी वर येऊन ते रस्त्यावर वाहात होते. अशा ठिकाणी खोदून पाहिले असता बाहेरून आघातामुळे जलवाहिनीचे नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. जलवाहिन्यांत पाणी नसल्याने त्या फुटल्याचे लक्षात आले नाही. आता पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.
दरम्यान, पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला पत्र लिहून दुरुस्तीसाठीचा खर्च महापालिकेकडे जमा करावा असे नमूद केले आहे. दरम्यान, हे पत्र अद्याप प्राप्त झालेले नसल्याचे स्मार्टसिटचे उपअभियंता सुरेश बोरसे यांनी सांगितले.
या ठिकाणी फुटल्या जलवाहिनी
- गणराज चौक झुडिओ समोर
- इराणी कॅफे समोर
- अष्टविनायक चौक पाटील वस्ती
- अष्टविनायक चौक परफेक्ट टेन सोसायटीजवळ
- मधुबन चौकात दोन ठिकाणी
- अष्टविनायक चौक वंडरपार्क सोसायटीजवळ
- बीएसएनएल कार्यालयाजवळ
- बीएसएनएल कार्यालयासमोर सर्व्हिस रस्ता
- अष्टविनायक चौक गिनी विवियाना सोसायटीजवळ
- बालेवडा जकात नाका
स्मार्ट सिटीच्या ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे बाणेर, बालेवाडी परिसरात अनेक जलवाहिन्या फुटल्या आहेत. त्याचा २५ लाख रुपयांचा खर्च स्मार्ट सिटीने ठेकेदाराकडून वसूल करावा असे स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनला देण्यात आले आहे.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग