pune Tendernama
पुणे

Pune : एकच होर्डिंग दुसऱ्यांदा पाडण्याची नामुष्की पालिकेवर का आली?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात नदीपात्रात बेकायदेशीरपणे महाकाय होर्डिंगचा सांगाडा उभे करणाऱ्याची मुजोरी महापालिकेने मोडून काढली. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार मंगळवारी (ता. ४) पहाटे चार वाजता सांगाडा जमीनदोस्त केला.

राज्य सरकारने २०२२मध्ये जाहिरातीचे धोरण तयार केले आहे. त्यात कोणत्याही शासकीय जागेत, नदीपात्रात होर्डिंग उभे करता येणार नाही, असे स्पष्ट नमूद केले आहे. असे असतानाही टिळक चौकात संभाजी पोलिस चौकीच्या पाठीमागे नदीपात्रात तीन होर्डिंगचा सांगाडा लागून उभा केला.

यापूर्वी न्यायालयाच्या आदेशानुसार होर्डिंग पाडले होते. परंतु, ‘महापालिकेने आमची परवानगी रद्द केली नाही’, असा दावा करत व्यावसायिकाने पुन्हा होर्डिंगचा सांगाडा उभा केला. हे काम थांबविण्यासाठी महापालिकेचे कर्मचारी गेले असता, त्यांना दादागिरी करून हुसकावून लावले. ‘आयुक्त आले तरी मी थांबत नसतो’, असा दमही त्या व्यावसायिकाने कर्मचाऱ्यांना दिला. याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला.

या प्रकरणाची महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन सोमवारी (ता. ३) कागदपत्रांची तपासणी केली. त्यात कसबा विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी कुचकामी भूमिका घेतल्याने होर्डिंग उभे राहिले होते. त्यावरून या कार्यालयातील कर्मचारी, अधिकाऱ्यांची झाडाझडती झाली.

रात्री उशिरापर्यंत कागदपत्रांची तपासणी झाली. विधी विभागाचा अभिप्राय घेण्यात आला. त्यात होर्डिंगची परवानगी संपून अनेक महिने झाल्याचे समोर आले. त्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्या आदेशानुसार आकाशचिन्ह विभागाने पहाटे चारच्या सुमारास क्रेनने सांगाडा पाडला.

सांगाडा जप्त करणे आवश्‍यक

तीन होर्डिंग उभे करण्यासाठी प्रत्येकी सुमारे दोन टन, असे सहा टन लोखंड वापरले आहे. गेल्या वर्षी होर्डिंग पाडल्यानंतर लोखंड जप्त केले नाही, त्याची विल्हेवाट न लावता तेथेच पडून होते. तत्कालीन आयुक्तांनी जप्त करण्याचा आदेश दिला होता. परंतु, त्याकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा वर्षभराने व्यावसायिकाने हाच सांगडा वापरून बेकायदेशीरपणे होर्डिंग उभे केले आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने सांगाडा जप्त केला पाहिजे.

पुणे महापालिकेने कागदपत्रांची तपासणी करून नदीपात्रात उभा केलेला सांगाडा मंगळवारी पहाटे पाडला.

- प्रशांत ठोंबरे, उपायुक्त, आकाशचिन्ह विभाग, महापालिका पुणे