hinjawadi flood  Tendernama
पुणे

Pune : हिंजवजी IT पार्क का गेला पाण्याखाली? चूक नक्की कोणाची?

टेंडरनामा ब्युरो

हिंजवडी (Hinjawadi) : जोरदार पावसाने आयटीनगरी हिंजवडी (Hinjawadi IT Park) पाण्याखाली गेली.

आयटीच्या रस्त्यावर अवतरलेल्या ‘नद्यां’ बाबतचे वृत्त आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले. एमआयडीसी व पीएमआरडीए प्रशासनावर नागरिकांकडून टिकेची झोड उठल्यावर एमआयडीसी प्रशासनाने रविवारी (ता. ८) सकाळपासून माणमधील जुन्या नळकोंडाळ्यांची तसेच ओढ्या- नाल्यांची साफसफाई करत पावसाळी पाणी वाहून जाण्याचे प्रवाह पुनर्जिवीत केले. मात्र, ही तात्पुरती डागडुजी नको. कायमचे ठोस उपाय करावेत, अशी मागणी जोर करत आहे.

माण फेज दोन येथील गवारे मळा परिसरातील पदपथ जेसीबीच्या साहाय्याने खोदण्यात आले. तसेच डॉलर कंपनी समोरील पावसाळी वाहिनीमध्ये अडकलेला कचरा व घाण काढून स्वच्छ करण्यात आली. तुंबलेले ओढे-नाले, गटारे व पावसाळी वाहिन्या साफ करण्यात आल्या. मेट्रो पुलाखालील दुभाजक तोडून पाण्याला वाट करून देण्यात आली.

रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमध्ये मुरूम-खडी टाकून ते बुजविण्यात आले. येथील पीव्हीआर मॉल समोरील बटरफ्लाय चौकात व बँक ऑफ महाराष्ट्र समोरील चौकात पावसाळी पाण्याचा निचरा होण्याबाबत उपाय योजना करण्याच्या सूचना वाहतूक पोलिसांकडून करण्यात आल्या आहेत.

वाहतुकीला आडकाठी ठरणाऱ्या अनेक बाबींवर उपाय योजना करण्याबाबत आम्ही वारंवार एमआयडीसी व पीएमआरडीए प्रशासनाकडे पाठपुरावा करत असतो. मात्र, त्याला कोणी फारसे गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे ऐनवेळी उद्‍भवलेल्या समस्येत जनता व पोलिस वेठीस धरले जातात. पाणी साठणाऱ्या अनेक ठिकाणांची माहिती देत त्याचा निचरा करण्याबाबत आम्ही पत्र दिले आहे.
- प्रसाद गोकुळे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, हिंजवडी वाहतूक विभाग

एमआयडीसी आयटी कंपन्या आणि गृह प्रकल्पांच्या परवानगीमधून महसूल गोळा करते. मात्र केवळ तिजोरी भरण्यापेक्षा पायाभूत सुविधा देखील पुरविण्याबाबत एमआयडीसीने गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. आधी पायाभूत सुविधा भक्कम करा. मग, गृहप्रकल्पांना परवानगी द्या, असे आमचे ठाम मत आहे.
- अर्चना आढाव, सरपंच, माण

लोकप्रतिनिधी म्हणून रहिवासी आमच्याकडे येऊन समस्यांच्या निवारणाची मागणी करतात. परंतु इथे कार्यरत असलेल्या सर्वच प्रशासकीय संस्थांना समस्यांचे अजिबात गांभीर्य नाही.
- गणेश जांभुळकर, सरपंच, हिंजवडी