Chandrakant Patil Tendernama
पुणे

Pune : नव्या महापालिका आयुक्तांना मंत्री चंद्रकांत पाटीलांनी काय दिला 'मंत्र'?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील वाहतूक कोंडी, जोडरस्त्यांची कामे, पाणी तुंबणे अशा विविध प्रकारच्या समस्या सुटणे आवश्यक आहे. महापालिकेकडून त्यावर अधिक सकारात्मक पद्धतीने काम होण्याची गरज आहे, अशी अपेक्षा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांच्याकडे व्यक्त केली.

महापालिकेचे नवनियुक्त आयुक्त राम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर पाटील यांनी त्यांची नुकतीच महापालिकेत भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या वेळी भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, आमदार भीमराव तापकीर, हेमंत रासने यांच्यासह गणेश बीडकर, श्रीनाथ भिमाले, दीपक पोटे आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘शहरातील समस्यांबाबत आम्ही यापूर्वी महापालिका आयुक्तांसह विविध विभागांसमवेत बैठका घेतल्या आहेत. त्याचा सातत्याने आढावादेखील घेत आहोत. यापुढे संबंधित कामांबाबत महापालिकेकडे पाठपुरावा केला जाईल. ही कामे सकारात्मक पद्धतीने कशी पूर्ण होतील, याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता आहे.’’