PMP Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांचा प्रवास होणार सोपा! PMPMLच्या ताफ्यात नव्या...

टेंडरनामा ब्युरो

पिंपरी (Pimpri) : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल PMPML) ताफ्यात ठेकेदारी तत्वावरील नवीन सीएनजी बस (CNG Bus) दाखल होणार सुरुवात झाली आहे.

मंगळवार (ता. १८) पर्यंत भोसरी, हडपसर, भेकराईनगर आणि शेवाळवाडी आगारांत एकूण ५१ बस दाखल झाल्या. त्यामुळे अनेक मार्गांवरील बस फेऱ्या वाढणार असल्याने प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीएच्या हद्दीत ‘पीएमपी’चे एकूण ३८१ मार्ग आहेत. या मार्गावर साधारण १ हजार ७०० बसच्या माध्यमातून सेवा दिली जाते. ‘पीएमपी’च्या ताफ्यातील सीएनजी बस जुन्या झाल्यामुळे गेल्या वर्षभरात १०० हून अधिक बस ताफ्यातून कमी झाल्या आहेत.

बस संख्या कमी झाल्यामुळे प्रवाशांना तास न तास पीएमपी स्थानकावर बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. मार्गावरील बस संख्या वाढविण्यासाठी प्रशासनाने ऑक्टोबर २०२४ मध्ये श्री बालाजी रोड लाइन्स ९३ बस, मे. वैष्णवी ट्रान्सपोर्ट ९३ बस, मे तिरुपती ट्रॅव्हल्स ॲण्ड गुड्स सर्व्हिसेस ९३ बस आणि मे. ॲन्टोनी रोड ट्रान्सपोर्ट सोल्सुशन्स १२१ बसचा करार केला होता.

करारानंतर १४० दिवसांत या बस पीएमपी ताफ्यात दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अजून सर्व बस दाखल झालेल्या नाहीत. आतापर्यंत केवळ ५१ बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे उर्वरित बस दाखल कधी होणार ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

कोणत्या आगारात किती बस

आगार / येणाऱ्या बस / आलेल्या बस

हडपसर - ९३ - १४

न.ता.वाडी - ९३ - ०

भेकराईनगर - ३३ - १४

शेवाळवाडी - ३० - १३

पुणे स्टेशन - ३० - ०

भोसरी - ६३ - १०

बालेवाडी - ३८ - ०

बाणेर - २० - ०

पीएमपीच्या पुण्यातील तीन आगारांत ४१ बस आल्या असून त्या प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत. तर भोसरी आगारात दहा बस आल्या आहेत. त्याही प्रवाशांच्या सेवेत दाखल होतील. उर्वरित बस टप्याटप्याने दाखल होणार आहे.

- सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपीएमएल