Old Mumbai Pune Highway
Old Mumbai Pune Highway Tendernama
पुणे

Pune : जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील प्रवास होणार सुसाट; कारण...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : जुन्या मुंबई - पुणे महामार्गावरील (Old Mumbai Pune Highway) रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणाऱ्या खडकी कॅन्टोन्मेंट हद्दीतील भाडेकरूंच्या जुन्या मालमत्तांचे मूल्यांकन करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची (PWD) निवड करण्यात आली आहे. या विभागानेही लष्कराकडून कागदपत्रे मागवून मूल्यांकन सुरू केले आहे. हे काम त्वरित पूर्ण झाल्यास खडकी रेल्वे स्थानक ते दारूगोळा कारखाना रुग्णालयापर्यंतच्या परिसरातील रस्ता रुंदीकरणाला गती येणार आहे.

बोपोडी चौक ते अंडी उबवणी केंद्रादरम्यानचे मेट्रो स्थानक वगळता मेट्रोचे बहुतांश काम झाले आहे. त्यानंतर पुणे महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम तातडीने सुरू केले. लष्कराने रस्त्यासाठी आवश्‍यक जागेसह दहा एकर जागा महापालिकेस दिली होती. त्यानुसार तेथे ४२ मीटर रस्त्याचे काम वेगात सुरू आहे.

दरम्यान, लष्कराच्या खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाने खडकी रेल्वे स्थानक परिसरातील जागा (सर्व्हे क्रमांक १०५) काही जणांना ९९ वर्षांच्या भाडेकराराने दिली होती. या जागांवर घरे, दुकाने, चित्रपटगृह उभारण्यात आले होते.

संबंधित भाडेकराराची मुदत २०२७ मध्ये संपणार होती. मात्र, मेट्रो व रस्ता रुंदीकरणामुळे त्यांना मुदतीपूर्वीच जागा सोडावी लागणार आहे. तर, लष्कराने संबंधित भाडेकरार संपवून महापालिकेस जागा देणे गरजेचे होते. प्रत्यक्षात तसे न झाल्याने अखेर मूल्यांकन करण्याचा प्रश्‍न निर्माण झाला होता. जागेचे मूल्यांकन त्रयस्थ संस्थेने करणे आवश्‍यक असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मूल्यांकनाची जबाबदारी दिली. मूल्यांकनानंतर उर्वरित रस्ता रुंदीकरण तत्काळ होण्याची चिन्हे आहेत.

‘पीडब्ल्यूडी’ची निवड का?
सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेल्या जागेच्या, मालमत्तेच्या मुल्यांकनाला राज्यभर अधिकृत मान्यता असते. कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत नाहीत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मूल्यांकन करणे आवश्‍यक असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

लष्कराच्या भाडेकरारावरील जागांच्या मुल्यांकनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला जबाबदारी दिली आहे. त्यांच्याकडून मूल्यांकन झाल्यानंतर रस्ता रुंदीकरणाच्या कामातील मोठा अडथळा दूर होईल.
- दिनकर गोंजारे, कार्यकारी अभियंता, पथ विभाग, महापालिका