पुणे (Pune) : सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या भरारी पथकाने प्लॅस्टिक विक्री करणारे, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्या व्यावसायिक व नागरिक यांच्यावर कारवाई करत जानेवारी महिन्यात सहा दिवसांत १ लाख १३ हजार ६०० रुपये दंड वसूल केला आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. या पथकात एक वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, दोन आरोग्य निरीक्षक व चार मुकादम यांची नेमणूक केल्याची माहिती सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना ५०० रुपये व प्लॅस्टिक विक्री करणाऱ्या व्यावसायिकांकडून ५००० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सिंहगड रस्ता कार्यालयांतर्गत घनकचरा व्यवस्थापनाचे उपायुक्त संदीप कदम, परिमंडळ क्र. ३च्या उप आयुक्त आशा राऊत, सहाय्यक आयुक्त नामदेव बजबळकर यांच्या आदेशान्वये व वरिष्ठ आरोग्य निरीक्षक आशिष सुपणार व मंगलदास माने यांच्या नियंत्रणाखाली दंडात्मक कारवाई केली. कारवाईबरोबर स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात आली.