Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : बाणेर, बालेवाडीत 'दुष्काळात तेरावा...'; काय आहे नेमका प्रकार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : एकीकडे गेल्या काही वर्षांपासून बाणेर, बालेवाडीतील (Baner, Balewadi) नागरिक पाणी टंचाईमुळे हैराण झाले आहेत. तर दुसरीकडे बालेवाडीतील पाण्याची टाकी भरून वाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जाण्याचा प्रकार घडत आहे. तसेच या टाकीला गळती असल्याचेही आढळून आले.

२४×७ समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत या भागातील पाणी प्रश्न काही अंशी सुटला असला तरी, अजूनही अनेक सोसायट्यांना टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. बालेवाडी येथील सर्वे नंबर २८ व २९ येथे सेव्हन ॲवेन्यू या सोसायटीजवळ समान पाणीपुरवठा योजने अंतर्गत पाण्याची टाकी बांधण्यात आली असून या टाकीमधून पाणी गळती सुरू आहे.

टाकी भरल्याने पाणी वरून वाहत असल्याचा एक व्हिडिओ प्रसार माध्यमांवर व्हायरल झाला असून या ठिकाणी लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी एकीकडे भीषण पाणी टंचाई व दुसरीकडे असा पाण्याचा अपव्यय हे पाहून नाराजी व्यक्त केली आहे. नविन टाकीची गळती होताना पाहून व लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. एल अँड टी कंपनीकडे देखभाल दुरुस्तीसह इतर सर्व जबाबदारी देण्यात आली आहे.

टाकीची सद्यस्थिती

- अनेक ठिकाणी चिरांतून पाणी गळती

-बांधकाम साहित्य टाकीवर पडून

-बांधकाम करताना वापरलेल्या फळ्या अजूनही टाकीतच

-टँकरसाठी असणाऱ्या पाईपमधून सतत पाणी वाहते

समान पाणीपुरवठा योजना सुरू झाली असली, तरी अजूनही आम्हाला अर्धा तास पाणी, तेही कमी दाबाने मिळते. टँकर आणावा लागतो. यावर खूप पैसे खर्च होतात.

- दत्ता बालवडकर, स्थानिक रहिवासी

टाकी भरून वाहिल्याने पाणी वाया गेले. त्यामुळे महापालिकेकडून ‘एल अँड टी’ला दंड केला आहे. तसेच जिथे टाकीला चिरा आहेत. त्या दुरुस्त करून घेण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

बालेवाडी भागातील टाकी भरून वाहिली याचे कारण वारजे येथे नवीन पंप सुरू केल्याने ठेकेदारास टाकी भरण्याचा अंदाज आला नाही व पाणी वाहिले. तरी इथून पुढे पाणी वाया जाणार नाही याची दक्षता घेण्यात येईल. ज्या ठिकाणी टाकीस लहान चिरा आहेत, त्या तातडीने भरून घेण्यात येतील.

- नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता, पाणीपुरवठा प्रकल्प