पुणे (Pune) : पुणे शहरात आपत्ती उद्भवल्यास त्वरित मदत करता यावी यासाठी प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाच्या स्तरावर जेसीबी, डंपर, पंप, मनुष्यबळ अशी यंत्रणा तैनात केली आहे. असे असतानाही महापालिकेचे विविध विभाग एकमेकांवर जबाबदारी झटकतात. त्यामुळे आता आपत्तीची जबाबदारी ही बांधकाम, पथ, सांडपाणी, उद्यान, क्षेत्रीय कार्यालय स्तरावरील अभियंत्यांवर असणार आहे. त्यामुळे या अभियंत्यांना आपापल्या हद्दीत लक्ष द्यावे लागणार आहे.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी पावसाळ्यात पूर्वीच्या कामाची बैठक घेतली. यावेळी अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी., ओमप्रकाश दिवटे यांच्यासह विभाग प्रमुख बैठकीला उपस्थित होते.
मलनिःसारण विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांसाठी स्वतंत्रपणे नालेसफाई, सांडपाणी वाहिनी स्वच्छता, पावसाळी गटार स्वच्छतेसाठी टेंडर काढल्या आहेत. समाविष्ट ३२ गावांसाठी आठ टेंडर काढल्या आहेत. पण नालेसफाई व पावसाळी गटारांच्या स्वच्छतेची कामे दर्जेदार होत नसल्याने पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रकार घडत आहेत.
मुख्य खात्यावरचे अवलंबित्व कमी
आपत्ती व्यवस्थापनासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयासाठी स्वतंत्रपणे जेसीबी, डंपर, पंप, मनुष्यबळ देण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यात वस्ती, सोसायट्यांमध्ये नाल्यांचे पाणी घुसल्यास किंवा रस्त्यावर पाणी आल्यास क्षेत्रीय कार्यालयांनी मुख्य खात्यांवर अवलंबून न राहता स्वतःहून मदतकार्य सुरू करावे, असा आदेश देण्यात आला आहे. यासाठी अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली आहे.
पाटबंधारेच्या नियंत्रण कक्षात महापालिकेचा अभियंता
खडकवासला धरणातून मुठा नदीत किती पाणी सोडले जात आहे याची अचूक माहिती मिळावी, महापालिका आणि पाटबंधारे विभागात समन्वय राहावा, यासाठी पाटबंधारे विभागाच्या पूर नियंत्रण कक्षात पुणे महापालिकेचा एक अभियंता असणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी दिली. दरम्यान, गतवर्षी महापालिका व पाटबंधारे विभागात समन्वय नसल्याने एकतानगरीमध्ये पाणी घुसले होते.