Railway Track
Railway Track Tendernama
पुणे

Pune : पुणे स्टेशनला 'टाटा'! कसा असेल पुण्याच्या बाहेरून जाणारा नवा रेल्वेमार्ग?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे स्थानकावरील (Pune Railway Station) वाढता ताण कमी करण्यासाठी तळेगाव - उरुळी या नव्या मार्गाचा विचार केला जात आहे. हा मार्ग व्हाया चाकण-रांजणगाव असा असेल.

रेल्वे बोर्डाने मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाला याचा डीपीआर तयार करण्याचा आदेश दिला आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून त्याचा ‘डीपीआर’ (सविस्तर प्रकल्प आराखडा) तयार करण्याच्या कामाला सुरवात होणार आहे. या नव्या मार्गामुळे चाकण व रांजणगाव तेथील उद्योगांना मोठा फायदा होणार आहे.

पुणे - लोणावळा व पुणे - दौंड या रेल्वे मार्गांवर क्षमतेपेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावत आहेत. त्यामुळे पुणे स्थानकात दाखल होणाऱ्या प्रवासी गाड्यांनाच फलाट उपलब्ध होत नसल्याने रोज सुमारे ७२ प्रवासी गाड्यांना स्थानकाच्या दोन्ही होम सिग्नलवर क्रॉसिंगसाठी थांबावे लागते. अशातच मुंबईहून दक्षिण भारतात जाणाऱ्या मालगाड्यांची संख्याही जास्त आहे.

त्यामुळे रेल्वे बोर्डाने तळेगाव ते उरुळी दरम्यान नवीन मार्गिका टाकण्याचा विचार केला आहे. सहा महिन्यांत या मार्गाचा ‘डीपीआर’ सादर करण्याचा आदेश देण्यात आला. त्यानुसार मध्य रेल्वेचा बांधकाम विभाग कामाला लागला आहे.

८० मालगाड्या पुणे स्थानकात दाखल होणार नाहीत

तळेगाव - उरुळी हा प्रस्तावित रेल्वे मार्ग हा केवळ मालगाड्यांसाठी ‘डेडिकेट’ असेल. त्यामुळे यावरून केवळ मालगाड्या धावतील. सद्यःस्थितीत पुणे स्थानकावरून रोज सुमारे ७० ते ८० मालगाड्यांची ये- जा असते. नवीन मार्ग तयार झाल्यावर या सर्व मालगाड्या नव्या मार्गावरूनच धावतील. परिणामी पुणे स्थानकावरील ताण कमी होऊन केवळ प्रवासी गाड्यांची वाहतूक होईल. प्रवासी गाड्यांनाही मार्गात थांबावे लागणार नाही, तसेच मालगाड्यांनाही सेक्शनमध्ये थांबावे लागणार नाही.

दुहेरी मार्गिका होणार

मुंबई-चेन्नई या मार्गावर प्रवासी रेल्वे गाड्यांसह मालगाड्यांची वाहतूक मोठी असते. हे लक्षात घेऊनच तळेगाव- उरुळी प्रस्तावित मार्ग हा दुहेरी असणार आहे. त्या दृष्टीनेच ‘डीपीआर’ तयार केला जाणार आहे. शिवाय पुणे - लोणावळा हा व्यग्र सेक्शन असल्याने रेल्वे मंत्रालयाने जाहीर केलेल्या तीन कॉरिडॉरमध्ये त्याचा आपसूकच समावेश होतो. त्यामुळे प्रस्तावित मार्गाला मंजुरी मिळणार हे जवळपास निश्चित आहे.

रेल्वे बोर्डाचे आदेश प्राप्त झाले असून, लवकरच तळेगाव - उरुळी नव्या मार्गिकेच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होईल. डीपीआर पूर्ण झाल्यावर तो रेल्वे बोर्डाला सादर केले जाईल. मंजुरी बाबतचा निर्णय रेल्वे बोर्ड घेईल.

- इंदू दुबे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे