Dukkar Khind  Tendernama
पुणे

Pune: चांदणी चौकातून सुसाट; मग या ठिकाणी का लागतोय 'ब्रेक'?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : वारजे येथे महामार्गावरील (Mumbai - Satara Highway) पुलाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी रस्त्याच्या खालील मातीचा भराव खचल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. परिणामी महामार्गावर वाहतूक कोंडी दुपटीने वाढली. वाहतूक ठप्प झाल्याने वाहनचालकांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.

वारजे येथे साताऱ्याच्या बाजूला जाणाऱ्या महामार्गावर ओढ्यावरील पुलाचे रुंदीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सोमवारी नवीन पुलाचे बांधकाम करताना जुन्या पुलाच्या मोरीलगतचा भराव खचला. सुमारे पाच ते सहा फूट आतील बाजूची माती ढासळली. येथे तीन पदरी रस्ता आहे. नवीन पुलाचे काम सुमारे सुरू असल्याने फक्त दोन-अडीच मार्गीका सुरू होत्या.

आता रस्त्याच्या खालील माती ढासळण्याच्या प्रकाराने आता फक्त दीड पदरी रस्ता सुरू ठेवावा लागत आहे. परिणामी, वाहनांच्या रांगा दीड किलोमीटर मागे म्हणजे डुक्कर खिंडीपर्यंत पोचली. वारजे वाहतूक विभागाला वाहतूक कोंडी फोडताना अक्षरशः दमछाक झाली.

साताऱ्याकडे जाणाऱ्या मार्गावर दररोज सायंकाळी गर्दी सुरू होते. अरुंद रस्त्यामुळे दुपारी तीन वाजल्यापासूनच वाहतुकीचा वेग मंदावला होता. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथील महामार्गाची पाहणी केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल.

- विशाल पवार, सहायक पोलिस निरीक्षक, वारजे वाहतूक विभाग

पुलाचे काम सुरू असताना मातीचा भाग ढासळला. तेथे अहोरात्र काम सुरू असून, उद्या सकाळी हे काम पूर्ण होईल. सध्या वाहतुकीसाठी एक मार्गिका बंद ठेवण्यात आली आहे.
- संजय कदम, प्रकल्प संचालक- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण