PMC Pune
PMC Pune Tendernama
पुणे

Pune : रंगरंगोटीच्या नावाखाली सुरू असलेली पुणेकरांची फसवणूक बंद करा!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यात जी-२० परिषद (G-20) झाली. त्यानिमित्ताने उड्डाणपूल, नदीवरील पुलांची रंगरंगोटी काढण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारने महापालिकेला (PMC) दिला होता. महापालिकेच्या प्रकल्प विभागाला हा निधी पूर्णपणे खर्ची पाडता आला नाही. त्यामुळे साडेचार कोटी रुपये परत गेले आहेत. शिवाय पुलांना रंग लावण्याचे कामही अपूर्ण आहे. रंगकाम करताना दर्जा राखला गेलेला नाही.

पुणे शहरात २०२३ मध्ये जी-२० परिषदेच्या तीन बैठका झाल्या. यावेळी सुमारे ३० देशातील वरिष्ठ अधिकारी, मंत्री पुण्यात येणार असल्याने सुशोभीकरणासाठी राज्य सरकारने महापालिकेला २०० कोटी रुपयांचा निधी दिला. त्यापैकी १० कोटी रुपयांचा निधी हा उड्डाणपूल, पूल, भुयारी मार्गांचे रंगकाम यासाठी होते. हा निधी ३१ मार्च २०२४ पर्यंत हा निधी खर्ची पाडण्याचे बंधन प्रशासनावर घालण्यात आले होते.

प्रकल्प विभागाने दोन कार्यकारी अभियंत्यांना प्रत्येकी १० पूल अशा २० पुलांच्या रंगकामाची जबाबदारी दिली. दोन्ही कार्यकारी अभियंत्यांना प्रत्येकी पाच कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. हे काम एकाच ठेकेदाराला न देता प्रत्येकी एक कोटीच्या १० टेंडर काढण्यात आल्या.

ज्या उड्डाणपूल, नदीवरीचे पूल, रेल्वे पूल, भुयारी मार्गांचे रंगकाम पूर्ण झाले आहे ते काम करणाऱ्या ठेकेदाराला तीन वर्षांचा दोन दायित्व कालावधी (डीएलपी) आहे. पण कामात दर्जा न राखल्याने एका वर्षाच्या आत रंग फिके पडल्याने रंगरंगोटी करूनही न केल्यासारखी स्थिती शहरात आहे.

टेंडर क्रमांक एक ते पाचमधील बहुतांश कामे पूर्ण झालेली असून पाच कोटी पैकी ४.५ कोटी रुपयांचा निधी खर्ची पडला आहे. तर सहा ते १० क्रमांकाच्या टेंडरचे काम लाल फितीमध्ये अडकले आहे. पाच कोटींपैकी एक कोटी रुपयांचे बिल देण्यात आले आहे. उर्वरित कामे ३१ मार्चपर्यंत संपलेली नसल्याने चार कोटी रुपयांचा निधी खर्ची पडलेला नाही.

पांढरा रंग मारून काम बंद
पुणे महापालिकेसमोरील जयंतराव टिळक पुलासह बंडगार्डन, मगरपट्टा उड्डाणपुलाला पांढरा प्रायमर मारून काम सुरू केले. पण त्यानंतर गेल्या दीड महिन्यापासून काम ठप्प आहे. प्रायमर मारताना स्वच्छता न करता पांढरा रंग लावल्याने दर्जा राहिलेला नाही. तर धायरी फाटा वांजळे उड्डाणपुलाचे वर्षभरापूर्वी पूर्ण रंगकाम केले होते, तेथे आता पुन्हा एकदा प्रायमर मारण्यात आला आहे.

निधी गेला आता पैसे कोण देणार?
३१ मार्चपर्यंत निधी खर्ची न पडल्याने हा निधी सरकारकडे परत गेला आहे. यामुळे रंगकाम पूर्ण झालेले नाही. पण गेल्या महिन्याभरापासून कामही ठप्प असल्याने अर्धवट असलेले काम पूर्ण कसे होणार असा प्रश्‍न निर्माण झाला आहे. तसेच हे काम पूर्ण करायचे असल्यास प्रकल्प विभागाला तरतूद उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे. पण निधी वाया गेला याची जबाबदारी कोणावर निश्‍चित होणार? असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

हे होणे गरजेचे होते
- रंगकामाची जागा पाण्याने धुवून झाडून स्वच्छ करणे
- पांढरा प्रायमर मारणे. हा रंग मारताना जुना रंग दिसता कामा नये
- प्रायमर सुकल्यानंतर ॲन्टिकार्बोनेशन पेंटचे दोन सेप लावणे आवश्‍यक
- या कामाला तीन वर्षांची ‘डीएलपी’ असल्याने या मुदतीत रंग उडाल्यास ठेकेदार जबाबदार

या पुलांचे रंगकाम झालेच नाही
- कै. सातबा कोद्रे उड्डाणपूल मुंढवा
- अलंकार टॉकीज रेल्वे उड्डाणपूल
- प्रिन्स आगाखान रेल्वे उड्डाणपूल
- संगमवाडी पूल
- बंडगार्डन पूल
- हडपसर गाडीतळ उड्डाणपूल
- मगरपट्टा उड्डाणपूल
- मुंढवा नदीवरील पूल
- धायरी फाटा वांजळे उड्डाणपूल
- जयंतराव टिळक पूल,
- राजाराम पूल

जी-२० परिषदेसाठी शहरातील उड्डाणपूल, नदीवरील पूल, भुयारी मार्गांची रंगरंगोटी करण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी आला होता. पण कामे पूर्ण न होऊ शकल्याने सुमारे ४.५ कोटी रुपयांचा निधी सरकारकडे परत गेला आहे. हा निधी परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच अर्धवट असलेली कामे ठेकेदाराला पूर्ण करण्यास सांगितले जाईल.
- अभिजित डोंभे, अधीक्षक अभियंता, प्रकल्प विभाग