Pune Traffic
Pune Traffic Tendernama
पुणे

Pune : पुण्यात सिंहगड रस्त्यावर लहान गतीरोधकामुळे काय झालेय पहा!

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) माणिकबाग येथील भगवद्‍गीता चौकात तातडीने मोठा गतिरोधक बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. लहान गतिरोधकामुळे अपघातांचे प्रमाण वाढल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

या परिसरात उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. याच चौकात छोटा गतिरोधकही बसविण्यात आला आहे. मात्र, त्याचा फारसा उपयोग होत नाही. वाहनचालकांचा गाडी चालविण्याचा वेग जास्त असल्यामुळे त्या गतिरोधकावरून जाताना गाडीचा वेग कमी होत नाही. पुणे महापालिकेच्या पथ विभागाने तातडीने येथे व्यवस्थित गतिरोधक तयार करावा, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

गतिरोधक नसल्याने रस्ता ओलांडण्यासाठी नागरिकांना, तसेच वाहनधारकांनाही खूप त्रास होतो. अनेकदा वाहने व पादचारी एकत्र आल्याने रस्ता ओलांडताना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. शिवाय गतिरोधक लहान असल्याने या ठिकाणी सतत छोटे-मोठे अपघातही होतात. त्यामुळे भगवद्‍गीता सोसायटी, रायकर पार्क, कुदळे पाटील टाउनशिप, विक्रांत पॅलेस, रघुनंदन प्राइड परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी मोठा गतिरोधक बसविण्याची मागणी केली आहे.