Contractor, Road Work (File)
Contractor, Road Work (File) Tendernama
पुणे

Pune: रस्ता खोदणाऱ्या 'त्या' ठेकेदाराला 1 लाख रुपयांचा दंड

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिनी टाकल्यानंतर रस्त्याची दुरवस्था झाल्याने पाणीपुरवठा विभागाने संबंधित ठेकेदाराला (Contractor) एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

नवीन जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदल्यानंतर तो पुन्हा सुस्थितीत आणणे आवश्‍यक आहे. औंध येथील आयटीआय रस्त्यावर जलवाहिनी टाकण्यात आली. त्यानंतर सुमारे ४० मीटर लांबीचा रस्ता खचून ठिकठिकाणी खड्डे पडले. १० दिवस उलटून गेले तरीही हे खड्डे बुजविण्यात आले नाहीत. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला.

यासंदर्भात नागरिकांनी तक्रार करूनही रस्तेदुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने ठेकेदाराला प्रतिदिन १० हजारांप्रमाणे १ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. हा प्रस्ताव अधीक्षक अभियंता नंदकिशोर जगताप यांनी सादर केला होता, त्याला पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी मान्यता दिली.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्ता खोदल्यानंतर संबंधित ठेकेदाराने तो चांगल्या दर्जाचा करणे आवश्‍यक आहे. औंध येथे काम योग्य पद्धतीने न झाल्याने ठेकेदाराला १ लाख रुपयांचा दंड केला आहे. ही रक्कम बिलातून वसूल केली जाईल.
- अनिरुद्ध पावसकर, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग