Ring Road
Ring Road Tendernama
पुणे

Pune Ring Road : पुण्याच्या रिंगरोडबाबत महत्त्वाची अपडेट! नव्या वर्षात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्याबरोबरच पुणे महानगर क्षेत्र विकासाला चालना देणाऱ्या रिंगरोडला (Ring Road) या वर्षात मुर्हूत लागला. त्यातही ‘एमएसआरडीसी’च्या (महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ) रिंगरोडने बाजी मारली, तर ‘पीएमआरडीए’चा रिंगरोड मार्गी लागण्याच्या दृष्टीने पावले पडण्यास सुरुवात झाली. नवीन वर्षात दोन्ही रिंगरोडच्या प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल, ही अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात भविष्यात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी होण्यास सुमारे ३६ वर्षांचा कालावधी लोटला. सुमारे १७० किलोमीटर लांबीच्या या रिंगरोडचे काम ‘एमएसआरडीसी’ने हाती घेतले. दोन टप्प्यांत होणाऱ्या या रिंगरोडच्या भूसंपादनास चार महिन्यांपूर्वी सुरुवात झाली. पश्‍चिम भागातील रिंगरोडचे भूसंपादन जवळपास पूर्ण झाले, तर पूर्व भागातील भूसंपादनाचे काम गतीने सुरू झाले आहे. त्यामुळे सरत्या वर्षात रिंगरोड मार्गी लागण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. नव्या वर्षात रिंगरोडसाठी टेंडर प्रक्रिया राबवून कामाला सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे ‘एमएसआरडीसी’कडून रिंगरोडचे काम सुरू असताना दुसरीकडे १९८७ च्या विकास आराखड्यात दर्शविण्यात आलेल्या रिंगरोडचे काम ‘पीएमआरडीए’कडून (पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण) हाती घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात साडेपाच किलोमीटर रस्त्याच्या भूसंपादनाच्या दृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

वर्षभरात दोन्ही शहरांच्या दृष्टीने ही महत्त्वपूर्ण बाब मानली जात आहे. त्यामुळे पुणे शहराला उशिरा का होईना दोन रिंगरोड मिळणार आहेत. बाहेरून येणारी वाहतूक हद्दीत न येता परस्पर बाहेरून जाणार आहे. त्याचा मोठा परिणाम या दोन्ही शहरांतील वाहतुकीवर होऊन कोंडी टाळण्यास मदत होणार आहे. एवढेच नव्हे, तर पुणे जिल्ह्यात नव्याने गुंतवणुकीला चालना देणारे हे दोन्ही महामार्ग ठरणार आहेत.

‘एमएसआरडीसी’च्या रिंगरोडची सद्यःस्थिती

- पूर्व आणि पश्‍चिम अशा दोन भागांत रिंगरोड

- एकूण लांबी - १७३ किलोमीटर

- रिंगरोड बांधकामासाठी अपेक्षित खर्च - २२ हजार कोटी

- बीओटी तत्त्वावर राबविल्यास अपेक्षित प्रकल्पाची किंमत - २६ हजार ८१८.८४ कोटी

- भूसंपादनाचा एकूण खर्च - सुमारे ११ हजार कोटी

- पश्‍चिम भागातील भोर, हवेली, मुळशी, मावळ या चार तालुक्‍यांतील रिंगरोड गावातून जाणार

- पश्‍चिम रिंगरोड भूसंपादन जवळपास पूर्ण

- पूर्व भागातील भूसंपादनाचे काम सुरू

- रस्ते बांधणीसाठी अंदाजे खर्च - ७ हजार कोटी

- जानेवारी महिन्यात टेंडर प्रक्रिया

‘पीएमआरडीए’च्या रिंगरोडची सद्यःस्थिती

- रिंगरोडची एकूण लांबी - ८३.१२ किमी

- रुंदी- ६५ मीटर

- मेट्रोसाठी राखीव लेन - ५ मीटर

- पुणे-सातारा ते नगर रस्त्याला जोडणार

- रिंगरोडला जोडणाऱ्या ४२ रस्त्यांचाही होणार विकास

- टीपी स्किमच्या माध्यमातून भूसंपादन

- हवेली, खेड, मावळ आणि मुळशी तालुक्यातून जाणार रस्ता

- पहिल्या टप्प्यात सोलू ते वाघोली या साडेपाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे भूसंपादन