Metro
Metro Tendernama
पुणे

Pune : हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या कामामुळे वैतागलेल्या नागरिकांना दिलासा; पालिकेची कारवाई

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : बाणेरमधील मुख्य रस्त्यालगतच्या पदपथावरील अनधिकृत फलकांवर १ सप्टेंबरपासून कारवाई करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

बाणेरमध्ये सध्या हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरू असल्याने नागरिकांना नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच बाणेर भागातील अनेक व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील पदपथावरच नाम फलक, जाहिरात फलक लावलेले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालताना अडथळा निर्माण होतो.

त्याअनुषंगाने १ सप्टेंबरपासून औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त गिरीश दापकेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आकाश चिन्ह विभागाकडून कारवाई करण्यात येत आहेत. पदपथावर अनधिकृतरीत्या उभारलेले फलक, नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी स्वतः काढून महापालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त दापकेकर यांनी केले आहे.

आकाशचिन्ह विभागाचे निरीक्षक अविष्कार दवणे, बहुउद्देशीय पथक पर्यवेक्षक संतोष कोळपे, सहायक चंद्रकांत भोसले तसेच इतर आकाश चिन्ह विभागाचे कर्मचारी यांच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली.