पुणे (Pune) : जिल्हा परिषदेच्यावतीने (Pune ZP) जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी स्थापत्य अभियंत्यांची वानवा आहे. जिल्हा परिषदेतील स्थापत्य अभियंत्यांची अनेक पदे रिक्त असल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.
यामुळे जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत सुरू असलेल्या ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यास आणि या कामांचे मूल्यांकन करण्यास जिल्हा परिषदेकडे अभियंते नसल्याचे चित्र दिसून आले आहे.
केंद्र पुरस्कृत जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील गावा-गावांत नळ पाणी योजनांची कामे सुरू करण्यात आलेली आहेत. यापैकी काही योजनांची कामे पूर्ण झाली असून, अशा योजनांचे मूल्यांकन पूर्ण करणे गरजेचे आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील स्थापत्य कनिष्ठ अभियंत्यांच्या जागा रिक्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या सात तालुक्यात नियमित कनिष्ठ अभियंते कार्यरत नसल्याने, येथील कामांचा कार्यभार अन्य कनिष्ठ अधिकाऱ्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपविण्यात आलेला आहे. त्यामुळे सध्या या तालुक्यातील पाणी योजनांचे परीक्षण आणि मूल्यमापन हे अतिरिक्त पदभार असलेले आणि कंत्राटी कर्मचारीच करू लागले आहेत.
आज अखेरपर्यंत जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यातील सुमारे १३४ पाणी योजनांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे अद्याप सुरु असून या कामांवर नियंत्रण ठेवणे, मूल्यांकन करणे आणि प्रशासकीय कामकाजाची सर्वस्वी जबाबदारी ही कनिष्ठ स्थापत्य अभियंत्यांवर असते.
मात्र, सध्या हवेली, मुळशी, पुरंदर, जुन्नर, मावळ प्रमुख तालुक्यांसह सात तालुक्यांमधील कनिष्ठ अभियंत्यांची पदे रिक्त असून, या तालुक्यांसाठी त्वरित नियमित कनिष्ठ अभियंते उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी केली असल्याचे जिल्हा परिषदेतील ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश खताळ यांनी सांगितले.