Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : पुणेकरांवर घोषणांचा पाऊस, पण बहुतांश कागदावरच राहणार; काय आहे कारण?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरावर पायाभूत सुविधा पुरविण्याचा ताण वाढत असताना निधी उभारण्याचे मोठे आव्हान महापालिकेपुढे आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी १० हजार कोटींचा टप्पा ओलांडून २०२४-२५ या वर्षाचा थेट ११ हजार ६०१ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प गुरुवारी (ता. ७) सादर केला.

सांडपाणी प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, जेनेरिक औषध भांडार, घरकूल योजना, भाडेतत्त्वावर घरे, आठ उड्डाण पूल, समतल विगलक अशा मोठ्या प्रकल्पांच्या घोषणांचा पाऊस पाडला आहे. उत्पन्नवाढीचे ठोस पर्याय न देता केवळ सरकारच्या अनुदानाच्या जिवावर महापालिकेने गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ हजार ९ कोटी रुपयांनी अर्थसंकल्प फुगविला आहे.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने महापालिका आयुक्तांकडून अर्थसंकल्प कधी मांडला जाणार, याकडे लक्ष लागलेले होते. गुरुवारी विक्रम कुमार यांनी स्थायी समितीला अर्थसंकल्प सादर केला. या वेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, विकास ढाकणे आदी उपस्थित होते.

असे आहेत उत्पन्नाचे पर्याय (रक्कम कोटी रुपयांत)

- मिळकतकर : २५४९

- जीएसटी : २५०२

- एलबिटी : ४९५

- बांधकाम विकास शुल्क : २४९२

- शासकीय अनुदान : १७८२

महसुली खर्च ६५०० कोटींपेक्षा जास्त

महापालिकेच्या अर्थसंकल्पात ११,६०३ कोटींपैकी ३५५६ कोटी रुपये हे कर्मचाऱ्यांच्या पगारावर खर्च होणार आहेत, तर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी २ हजार ९५२ कोटी उपलब्ध होणार आहेत. त्यात शहराची स्वच्छता, वीज खर्च, पाणी पट्टी, इमारतींची देखभाल आदींचा समावेश आहे, तर शहरात पाणीपुरवठा, सांडपाणी, कचरा प्रकल्प, रस्ते बांधणे यासह इतर नव्या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात ५ हजार ९३ कोटींची तरतूद केली आहे. त्यामध्ये १५०० कोटींच्या कामांची तरतूदही चालू असलेल्या कामासांठी आहे. त्यामुळे प्रत्यक्षात ३५०० कोटी रुपयेही रक्कम नव्या प्रकल्पांसाठी उपलब्ध होणार आहे.

आचारसंहिता अडथळा

महापालिका आयुक्तांनी दोन हजार कोटी रुपयांनी अर्थसंकल्प फुगवलेला असला तरी त्याच्या अंमलबजावणीत निवडणुकीच्या आचारसंहितेचा मोठा अडथळा निर्माण होणार आहे. २०२४-२५ या वर्षात लोकसभा, विधानसभा आणि महापालिका तीन निवडणुकांसाठी प्रत्येकी ४५ दिवस आचारसंहिता असते. त्यामुळे सुमारे पाच महिने कोणतेही धोरणात्मक निर्णय घेणे, टेंडर काढता येणार नसल्याने या अर्थसंकल्पातील बहुतांश कामे व योजना कागदावरच राहण्याची शक्यता आहे.

प्रमुख प्रस्तावित नवीन कामे

- राजीव गांधी प्राणिसंग्रहालयात पिसोरी हरिण खण, लायन टेल्ड मकाक खंदक, सर्पोद्यान उभारणार

- वाघोली, कोरेगाव पार्क, पाषाण, सूस, कोंढवा खुर्द, म्हाळुंगे, नऱ्हे, उत्तमनगर, वारजे, येवलेवाडी, मांजरी येथे गॅस दाहिनी उभारणे

- बंडगार्डन येथे ३५० किलोवॉटचा जलविद्युत प्रकल्पासाठी १२ कोटींची तरतूद

- घोरपडे पेठेतील महापालिका वसाहतीचे पुननिर्माण

- अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयासाठी १४ मजली इमारत

- कोंढवा खुर्द येथील क्रीडांगण उभारणे व २०० मीटरचे स्केटिंग रिंग तयार करणे

- आठ रस्त्यांचे भूसंपादन करण्यावर भर

- बाणेर, खराडी, महंमदवाडी, धायरी, बावधन येथे अग्निशामक केंद्र उभारणार