पुणे (Pune) : पुणे महापालिकेच्या (PMC) शाळांना पुरविल्या जाणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल PMPML) स्कूल बस सेवेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी महिला सुरक्षा रक्षक मिळण्याची शक्यता आहे.
त्याबाबतची टेंडर प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून शाळा सुरू झाल्यानंतर महिला सुरक्षा रक्षक पीएमपीएलच्या स्कूल बसमध्ये नेमण्याची प्रक्रिया होणार आहे. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडून पावले उचलण्यात येऊ लागली आहेत.
स्वारगेट एसटी बसस्थानकात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर शहरातील महिला सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला होता. विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या स्कूल बस, स्कूल व्हॅनमध्ये महिला साहाय्यक असतात. मात्र, महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या पीएमपीएल बसमध्ये महिला मदतनीस, महिला सुरक्षा रक्षकांचा अभाव होता.
स्वारगेट येथील घटनेनंतर महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, महापालिकेच्या शिक्षण विभागानेदेखील महापालिकेच्या शाळांच्या बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक, महिला मदतनीस देण्याबाबतचे पत्र पाठविले होते. त्याची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी महापालिका शाळांच्या पीएमपीएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक देणार असल्याचे सांगितले होते.
त्यास अडीच महिने उलटूनही महापालिका प्रशासनाकडून महिला सुरक्षा रक्षक नेमण्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेला गती देण्यात येत नव्हती. याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर तांत्रिक प्रक्रियेला गती देण्यात आली.
दरम्यान, सुरक्षा विभागाकडून त्याबाबतचा प्रस्ताव तयार केला होता. त्यानंतर अन्य विभागांसह ‘पीएमपी’ स्कूल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक पुरविण्यासाठीच्या टेंडर प्रक्रियेला गती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया १५ ते २० दिवसांत पूर्ण होऊन महिला सुरक्षा रक्षक नेमण्यास सुरवात होण्याची शक्यता आहे. मात्र ही प्रक्रिया पूर्ण कधी होणार, संबंधित महिला सुरक्षा रक्षकांना प्रशिक्षण केव्हा मिळणार आणि त्यांची नेमणूक केव्हा होणार? हा प्रश्न अद्याप ही कायम आहे.
दृष्टिक्षेपात
- महापालिकेच्या शाळांना पुरविली जाणारी बससेवा - २०० ते ३००
- शिक्षण विभागाच्या पत्रात महिला सुरक्षा रक्षकांची केलेली मागणी - १००
- शाळांच्या पीएमपीएल बसमध्ये प्रत्यक्षात पुरविण्यात येणाऱ्या मदतनिसांची संख्या - ७० ते ८०
महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची ने-आण करणाऱ्या पीएमपीएल बसमध्ये महिला सुरक्षा रक्षक देण्यासाठीची टेंडर प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. शिक्षण विभागाने केलेल्या मागणीनुसार शाळा सुरू झाल्यानंतर त्यांना महिला सुरक्षा रक्षक मिळतील.
- राकेश विटकर, सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका