School
School Tendernama
पुणे

Pune : पुण्यातील लाखभर विद्यार्थ्यांना पीएमसीकडून मिळणार Good News! थेट बॅंक खात्यात...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिने झाल्यानंतर अखेर पुणे महापालिकेच्या (PMC) शाळांमधील सुमारे लाखभर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, गणवेश खरेदीसाठी थेट बँक खात्यात (DBT) पैसे जमा केले जाणार आहेत. यासाठी ३९ कोटी ५५ लाख रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली आहे. महापालिकेच्या शाळांमधील ८३ टक्के विद्यार्थ्यांच्या बँक खात्याची माहिती अद्ययावत झाली असून, आठवडाभरात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत.

पुणे महापालिकेच्या शिक्षण मंडळाने २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी टेंडर प्रक्रिया न काढता हे पैसे प्रत्येक विद्यार्थ्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात विद्यार्थ्यांना पैसे मिळणे आवश्‍यक असताना प्रशासनाकडून विद्यार्थ्यांची बँक खात्यांची माहिती अद्ययावत करणे, भांडार विभागाकडून प्रत्येक वस्तूचे बाजारभाव मागवून ते दर निश्‍चीत करणे यास उशीर करण्यात आला.

त्याचप्रमाणे शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या, शिक्षण विभागाला पूर्णवेळ अधिकारी नसणे यामुळे प्रशासकीय गोंधळ निर्माण झाला. त्यामुळे सप्टेंबर महिना उजाडला तरीही विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. अखेर भांडार विभागाकडून दर निश्‍चीत झाल्याने प्रशासकीय मान्यता घेण्याच्या प्रक्रियेला गती आली. मंगळवारी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ३९ कोटी ५५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला.

पुणे महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी प्रत्येक इयत्तेनिहाय वस्तूंचे दर निश्‍चित झाले आहेत. त्यानुसार, शिक्षण विभागाला ३९ कोटी ५५ लाख रुपयांची आवश्‍यकता आहे. या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. पुढील काही दिवसांत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील.

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका