Radhakrishna Vikhe Patil
Radhakrishna Vikhe Patil Tendernama
पुणे

Pune News : 'त्या' अनधिकृत बांधकामांवर हातोडा पडणार? महसूलमंत्री विखेंचे आदेश

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (PMRDA) हद्दीतील अनधिकृत बांधकामावर कारवाई करावी आणि त्याबाबतचा अहवाल सादर करावा, अशा सूचना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी प्राधिकरणाला दिल्या आहेत.

आमदार भीमराव तापकीर यांनी विधिमंडळ अधिवेशनात विचारलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना महसूल मंत्री विखे पाटील यांनी याबाबत माहिती दिली. हवेली तालुक्यातील मौजे घेरा सिंहगड ग्रामपंचायत क्षेत्रातील सांबरवाडी, थोपटेवाडी येथील एका गृहरचना संस्थेच्या सातबारा उताऱ्यावर आदिवासी समाजाची मालकी किंवा वहिवाट असल्याचे आढळून आले नाही. या संस्थेने ग्रामपंचायत आणि संबंधित विभागाची परवानगी न घेता शेतजमिनीचे तुकडे करून त्यावर अनधिकृतरीत्या दोन हजार चौरस फूट जागेवर बंगले, फार्म हाउसचे बांधकाम सुरू आहे, हे खरे आहे. टेकड्या, डोंगर फोडून ही बांधकामे सुरू आहेत, असे विखे पाटील म्हणाले.

बेकायदा अकृषिक वापर करून बांधकामे करताना गौणखनिज विभागाची कोणतीही परवानगी घेतल्याचे आढळून आलेले नाही. त्यामुळे बेकायदा उत्खननाची चौकशी करून कारवाई करण्याचे हवेली तहसीलदार यांनी कळविले आहे. सांबरवाडी, थोपटेवाडी ही गावे पीएमआरडीए क्षेत्रात येत असल्याने अवैध बांधकामावर योग्य कारवाई करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याच्या सूचना पीएमआरडीएला दिल्या आहेत, असेही विखे पाटील यांनी सांगितले.