नाशिक (Nashik): अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाच्या बदलेल्या आरेखनावरून नाशिक आणि अहिल्यानगर (नगर) जिल्ह्यात तीव्र वाद पेटला आहे. हा रेल्वेमार्ग थेट न होता अहिल्यानगर आणि शिर्डी मार्गे वळवण्याच्या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयावर स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या बदललेल्या मार्गाची अधिकृत घोषणा करताच सिन्नर, संगमनेर, नारायणगाव आणि नाशिक परिसरातून या निर्णयाविरोधात मोठा असंतोष निर्माण झाला आहे.
पुणे-शिर्डी दरम्यान वंदेभारत रेल्वेच्या प्रारंभाच्या निमित्ताने आलेल्या रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पुणे नाशिक रेल्वेमार्ग हा अहिल्यानगर, शिर्डीमार्गे होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यात या नवीन रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रियाही सुरू केली आहे. यामुळे नाशिक, सिन्नर, संगमनेर व नारायणगाव परिसरातून या निर्णयाविरोधात असंतोष निर्माण झाला आहे.
सोशल मिडियावर या निर्णयाविरोधात प्रतिक्रिया उमटल्या असून आमदार सत्यजित तांबे यांनी या निर्णयाचा तसेच रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचा निषेध केला आहे. त्याचवेळी भाजपच्या गुड गव्हर्नन्स सेलने या नवीन रेल्वेमार्गाला व्यवहार्य असे संबोधून त्याचे समर्थन केले आहे. यामुळे पुढच्या काळात नाशिक व नगर जिल्ह्यात नाशिक-पुणे रेल्वे शिर्डीमार्गे नको, याविरोधात रान पेटणार असल्याचे दिसत आहे.
यापूर्वी महाराष्ट्र सरकारने महारेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून नाशिक-पुणे हा सेमीहायस्पीड रेल्वेमार्ग उभारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महाराष्ट्र सरकार व केंद्र सरकार प्रत्येकी दहा टक्के खर्चाचा वाटा उचलणार होते. त्या मार्गाला रेल्वेमंत्रालयाची मान्यता मिळण्याच्या आधीच त्या रेल्वेमार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया सुरू झाली.
दरम्यान २००२ मध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी हा रेल्वेमार्ग व्यवहार्य नसल्याचे सांगत त्याच्या सविस्तर प्रकल्प अहवालास मान्यता दिली नाही. यासाठी रेल्वेमंत्रालयाने नारायणगाव येथील जीएमआरटीच्या महाकाय दुर्बिणींना धोका निर्माण होऊ शकतो, याचेही कारण सांगितले होते.
तो रेल्वेमार्ग व्यवहार्य करण्यासाठी तसेच जीएमआरटीच्या दुर्बिणींना त्रास होणार नाही, यावर उपाय म्हणून नाशिक-शिर्डी-अहिल्यानगर पुणे हा नवीन मार्ग सूचवण्यात आला. त्यानुसार रेल्वेमंत्रालयाने या मार्गासाठी सर्वेक्षण करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याच्या भूसंपादनाचीही तयारी सुरू केली आहे.
दरम्यान या बदललेल्या रेल्वेमार्गाला नाशिक, संगमनेर, नारायणगाव, आंबेगाव या भागातून मोठा विरोध झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलकांना यावर उपाय शोधण्याचे आश्वासन देत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षात रेल्वेमंत्रालयाने या नाशिक-शिर्डी-पुणे या मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून त्याप्रमाणे रेल्वेमार्गाची उभारणी करण्यात येणार असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे. त्याविरोधात आमदार सत्यजीत तांबे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गाला विरोध नसल्याचे स्पष्ट करतानाच नाशिक-पुणे रेल्वेमार्ग स्वतंत्र करण्याची गरज होती, असे म्हटले आहे. नाशिक-शिर्डी रेल्वेमार्गाने मंबई शिर्डी रेल्वेचे अंतर ५० किलोमीटरने कमी होणार आहे. मात्र, नाशिक-शिर्डी रेल्वे मार्गामुळे नाशिक-पुणे अंतर वाढणार असून नाशिक व पुणे येथील प्रवाशांना या रेल्वेमार्गाचा काहीही उपयोग होणार नसल्याचे म्हटले आहे. तसेच रेल्वेमंत्र्यांनी मार्ग उभारताना आर्थिक फायदा या एकमेव निकषाऐवजी त्या भागाचा विकास करण्याची भूमिका असली पाहिजे, असे म्हटले आहे.
नाशिकहून पुण्याला रस्त्याने जायला साडेचार-पाच तास लागतात. जर नाशिक-पुणे रेल्वे सरळमार्गे झाली तर हे अंतर अवघ्या पावणेदोन तासांत पार करता येऊ शकतं, पण केंद्रीय मंत्री जनतेचं हित न बघता फक्त आर्थिक चष्म्यातून याकडे बघत आहेत यामुळे एक अव्यवहार्य प्रकल्प पूर्ण करून या भागातील लोकांचे न भूतो ना भविष्य असं नुकसान करत असल्याचे म्हटले आहे.
भाजपकडून समर्थन
दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या गुड गव्हर्नन्स सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप पेशकार यांनी एखादा रेल्वे मार्ग सरळ असणे हे अंतर, वेळ आणि खर्चाच्या दृष्टीने फायदेशीर मानले जाते. मात्र, काही वेळा विकासकामांमध्ये केवळ भौगोलिक किंवा आर्थिक घटक नव्हे तर वैज्ञानिक आणि राष्ट्रीय महत्त्वाच्या बाबींचाही विचार करावा लागतो, असे म्हणत नाशिक-शिर्डी-नगर-पुणे या नव्या रेल्वेमार्गाचे समर्थन केले आहे.
जीएमआरटीचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता, त्याच्या कार्यक्षमतेवर कोणताही परिणाम होणार नाही याची काळजी घेणे ही देशाची जबाबदारी आहे. रेल्वे मार्गाचे नियोजन करताना केवळ अंतर कमी करणे हा एकमेव निकष नसतो. वैज्ञानिक संस्था, पर्यावरण, नाशिक शिर्डी चे धार्मिक महत्त्व, लोकसंख्या, धार्मिक पर्यटन, होणाऱ्या डिफेन्स कॅरिडॉरमधील, आर्थिक व्यवहार्यता आणि भविष्यातील विकास या सर्व घटकांचा एकत्रित विचार केला गेला आहे.
याच पार्श्वभूमीवर नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाचे नियोजन करताना शिर्डी-अहिल्यानगर मार्गे जाणारा पर्याय अधिक व्यवहार्य मानण्यात आल्याचे पेशकार यांचे म्हणणे आहे. नाशिक-पुणे रेल्वे मार्ग सरळ रेषेत आखणे तांत्रिकदृष्ट्या आकर्षक वाटत असले तरी प्रत्यक्षात जीएमआरटीच्या परिसरातून उच्च क्षमतेचा विद्युत रेल्वे मार्ग नेणे हे वैज्ञानिक संशोधनासाठी अडथळा निर्माण करणारे ठरू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.