Pune Nashik Highway Tendernama
पुणे

Pune Nashik Highway : 15 वर्षांपासून का रखडले पुणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम?

PCMC : पुणे-नाशिक महामार्गाच्या कामासाठी राज्य सरकारसह पिंपरी-चिंचवड महापालिकेने भूसंपादन करणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकार व महापालिकेचे याकडे लक्ष नाही.

टेंडरनामा ब्युरो

चाकण (Chakan) : पुणे-नाशिक महामार्गाच्या आठ पदरीकरणाचे काम १५ वर्षांपासून रखडले आहे. वाहतूक कोंडीत मात्र सर्वसामान्य माणूस, कामगार, प्रवासी, विद्यार्थी, उद्योजक सारेच अडकले आहेत. केंद्रीय रस्ते विकास मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना अनेकांनी निवेदने दिली; परंतु काम काही मार्गी लागत नाही. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील ६० टक्के भूसंपादन रखडल्यामुळे हे काम अडले आहे.

पुणे-नाशिक महामार्गाच्या कामासाठी राज्य सरकारसह पिंपरी-चिंचवड महापालिकेने भूसंपादन करणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकार व महापालिकेचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे या मार्गाच्या कामाची टेंडर प्रक्रिया सुरू होत नाही. त्यामुळे सर्वांनाच वाहतूक कोंडीचा त्रास जाणवत आहे. अनेक निवडणुका आल्या आणि गेल्या. अनेक वेळा आंदोलने झाली. परंतु महामार्गाचे काम होत नाही.

भूसंपादन होण्याची गरज

नाशिक फाटा ते मोशीदरम्यान पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीतील भूसंपादन न झाल्याने या मार्गाचे काम रखडले आहे. महापालिकेने तसेच राज्य सरकारने हे भूसंपादन करणे गरजेचे आहे. भूसंपादनाअभावी टेंडर प्रक्रिया रखडली आहे, असे केंद्रीय रस्ते वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

चार जिल्हे जोडणारा मार्ग

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हा पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतून तसेच चाकण औद्योगिक वसाहती जवळून जातो. हा महामार्ग चाकण- शिक्रापूर,चाकण -तळेगाव मार्गाला जोडतो त्यामुळे हा मार्ग महत्त्वाचा आहे. या मार्गावरून दररोज एक लाख वाहने ये- जा करतात. हा मार्ग पुणे, नाशिक, मुंबई, अहिल्यानगर या जिल्ह्यांना जोडणारा आहे.

महामार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. या वाहतूक कोंडीमुळे अनेकांचा वेळ यात वाया जातो. कामगारांना वेळेवर कंपनीत कामावर जाता येत नाही. विद्यार्थ्यांना वेळेवर शाळा, कॉलेजात जाता येत नाही. रुग्णांना, अपघातग्रस्तांना वेळेत रुग्णालयात पोहचवता येत नाही. त्यामुळे या मार्गाचे काम लवकर व्हावे अशी मागणी तपन कांडगे, कुणाल कड, धीरज मुटके, शशिकांत कड आदींनी केली आहे.