पुणे (Pune) : महापालिकेने गणेशोत्सवात फिरत्या विसर्जन हौदाचे नियोजन केले आहे. पण हे फिरते हौद एकाच ठिकाणी थांबून आहेत, नागरिकांना विसर्जनासाठी ते सापडत नाहीत अशी अवस्था आहे. त्यावर आता महापालिका प्रशासनाने खुलासा करत या गाड्या फिरत आहेत. जर ठेकेदाराने गाड्यांना जीपीएस लावले नसेल तर त्याचे बिल देणार नाही असे स्पष्ट केले आहे. तसेच गणेशोत्सवानिमित्त तात्पुरत्या शौचालयांच्या स्वच्छतेकडेही ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत.
महापालिका प्रशासनाने ४२ बांधलेले हौद, २६८ लोखंडी टाक्या, २५२ मूर्ती दान केंद्र उभारले अशी विसर्जनाची व्यवस्था केली आहे. कोरोना संपल्याने नागरिक घराबाहेर पडून या ठिकाणी विसर्जन करत आहेत. त्यामुळे फिरत्या हौदाची गरज राहिलेली नाही. तरीही यंदाच्या वर्षी तब्बल १.४२ कोटी रुपयांच्या दोन निविदा काढण्यात आल्या. या दोन्ही निविदांचे काम स्वयंभू ट्रान्स्पोर्ट या ठेकेदार कंपनीला देण्यात आले आहे. १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी प्रत्येकी १० याप्रमाणे १५० फिरते हौद तयार केले आहेत. पण गाड्या नेमक्या कुठे आहेत हे नागरिकांना कळत नाही, त्यावर स्पीकर व माईक नसल्याने विसर्जनासाठी नागरिकांना यावे असे आवाहन ही करता येत नाही. याबाबत तक्रारी केल्यानंतर ठेकेदाराच्या गाड्यांवर लक्ष ठेवले जात आहे, स्पीकरची व्यवस्था केली आहे असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अद्यापही अनेक गाड्यांवर कोणतीही व्यवस्था नाही.
अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार म्हणाले, ‘‘ठेकेदाराने प्रत्येक गाडीला जीपीएस लावणे आवश्यक आहे. रोज ही वाहने कुठे फिरले हे आम्ही जीपीएसवर तपासूनच बिल दिले जातील. अन्यथा रक्कम कापून घेतली जाईल.
अद्याप जीपीएस तपासले नाही
पाचव्या दिवसापासून फिरते हौद विसर्जन सेवा सुरु झाली. पण त्या दिवसापासून अधिकाऱ्यांनी जीपीएस तपासले का? असे विचारले असता उपायुक्त संदीप कदम म्हणाले, ‘‘ठेकेदाराकडून जीपीएस लोकेशन अद्याप पाठवले नसल्याने ते तपासले नाहीत.
स्वच्छतागृहाला दिवसाला ११०० रुपये भाडे
महापालिका प्रशासनाने घाईमध्ये मोबाईल टॉयलेटचे काम नव्या ठेकेदाराला दिले आहे. शहरात ३८० स्वच्छतागृह ठेवले आहेत. तेथे त्याने पाणी, बकेटची व्यवस्था करणे आवश्यक आहे. तसेच दिवसातून दोन वेळा स्वच्छताही आवश्यक आहे. पण त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने या स्वच्छतागृहाच्या परिसरात प्रचंड दुर्गंधी निर्माण होत आहे. एकीकडे महापालिका एका स्वच्छता गृहाला दिलासा ११०० रुपये मोजत असताना दुसरीकडे ठेकेदाराकडून त्याच्या देखभाल करण्याकडे दुर्लक्ष करत आहे. सोबतच प्रशासनाची डोळेझाक होत आहे.
घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम म्हणाले, पाणी, बकेट, स्वच्छता यासह सर्व सुविधा ठेकेदाराकडून तपासणे आवश्यक आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या काळात हे स्वच्छतागृहाची तपासणी करू, जर आवश्यक गोष्टी नसतील त्यावर कारवाई करू.