Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : 'या' पर्यायी रस्त्यामुळे विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी होणार कमी

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : गणेश खिंड रस्त्यावरील मेट्रो आणि उड्डाणपुलाच्या कामामुळे आनंद ऋषिजी चौकात (पुणे विद्यापीठ चौक) प्रचंड वाहतूक कोंडीमुळे पुणेकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे आता शेतकी महाविद्यालयातून सिंचननगर, औंध, बोपोडीकडे जाण्यासाठी रस्ता खुला करण्याचा निर्णय आज (ता. २०) पालकमंत्री अजित पवार यांच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे गणेशखिंड रस्त्यावर कोंडीत अडकणाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

शिवाजीनगर हिंजवडी मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. याच प्रकल्पाअंतर्गत पीएमआरडीएकडून विद्यापीठ चौकात बहुमजली उड्डाणपूल बांधला जाणार आहे. गेल्या काही महिन्यांपासून यासाठी महापालिकेने रस्त्याच्या दोन्ही बाजूने रुंदीकरण करण्यात आले आहे. वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी उड्डाणपुलाचे काम ऑगस्ट २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काम देखील वेगात होणे गरजेचे असल्याने गणेश खिंड रस्त्यावरील वाहतूक कमी करणे गरजेचे आहे. त्यामुळे पुणे महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) अधिकाऱ्यांनी शेतकी महाविद्यालयातील रस्‍त्याचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करावा असा पर्याय सुचविला होता. त्यानंतर प्रत्यक्ष जागा पाहणीही झाली. आज अजित पवार यांनी बैठकीमध्ये या पर्यायी रस्त्यावर महापालिका, पीएमआरडीए, वाहतूक पोलिसांशी चर्चा केली. त्यामध्ये रस्त्याची दुरुस्ती करून वाहतूक पोलिसांशी समन्वयाने रस्ता खुला केला जाईल असा निर्णय पवार यांनी घेतला.

सकाळी सात ते रात्री साडेदहा

शेतकी महाविद्यालयाच्या आतील म्हसोबा गेट ते सिंचननगर हा रस्ता दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी खुला केला जाईल. सकाळी सात ते रात्री साडे दहा या वेळेत हा रस्ता खुला असणार आहे. रात्री येथील वाहतूक बंद असेल. त्यामुळे डेक्कन, शिवाजीनगरकडून औंध, बोपोडी, सांगवी यासह इतर भागात जाणाऱ्यांसाठी हा रस्ता उपयुक्त ठरणार आहे.

लवकरच रस्ता खुला

अजित पवार यांनी आज घेतलेल्या बैठकीत शेतकी महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांशीही पवार यांनी हा पर्यायी रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध करण्यावर शिक्कमोर्तब झाले. पण याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे अधिकारी संयुक्तरित्या नियोजन करून हा रस्ता कधीपासून खुला होणार याचा निर्णय जाहीर करणार आहेत.

किमान अर्धातास कोंडीतच

विद्यापीठ चौकात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे दुचाकीस्वार सकाळी आणि संध्याकाळी या दोन्ही वेळेला किमान अर्धातास कोंडीतच अडकतो. तर चारचाकी चालकांचा किमान एक तास तरी वाया जात आहे. त्यातच अतिमहत्त्वाचे व्यक्तींच्या ताफ्यामुळे कोंडीत आणखीन भर पडते. शेतकी महाविद्यालयातील पर्यायी रस्ता खुला झाल्यानंतर ही कोंडी काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.