Property Tax Tendernama
पुणे

Pune : मिळकतकर थकल्याने टाळे ठोकलेल्या प्रॉपर्टींचा महापालिका करणार लिलाव

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : मिळकतकराची थकबाकी वसूल करण्यासाठी पुणे महापालिकेने सुरू केलेल्या मोहिमेमध्ये आत्तापर्यंत अडीच हजार मिळकतींना टाळे ठोकले आहे. त्यापैकी सुमारे दोन हजार मिळकतींचा लिलाव करून पैसे वसूल केले जाणार आहेत. या ‘महालिलावा’ची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली असून, पुढील महिन्यात हे लिलाव होण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात मिळकतकर विभागाला २७०० कोटी रुपयांचे उद्दिष्ट दिले आहे. त्यापैकी आत्तापर्यंत १८५० कोटी रुपयांचा कर वसूल झाला आहे. आर्थिक वर्ष संपण्यास तीन महिने बाकी असताना आणखी ८५० कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान मिळकतकर विभागापुढे आहे. त्यातच समाविष्ट ३२ गावांतील मिळकतकर वसुलीला स्थगिती दिल्याने सुमारे ३०० कोटींचे नुकसान होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मिळकतकर विभागाने थकबाकी वसुलीवर भर दिला आहे.

दोन डिसेंबरपासून महापालिकेने बँड वाजवून थकबाकी वसुली सुरू केली आहे. त्यात सुमारे ४४९ मिळकतधारकांकडून ५२ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी वसूल केली आहे. अनेक शिक्षण संस्था, व्यावसायिक कार्यालये यांसह अन्य संस्थांची मोठी थकबाकी आहे, त्यांना नोटीस बजावून टाळे ठोकण्याची मोठी मोहीम सुरू आहे. याअंतर्गत सुमारे अडीच हजार मिळकतींना टाळे ठोकले असून, मिळकतधारकांनी वेळीच कर न भरल्यास त्या मिळकतींचा लिलाव केला जाणार आहे. यासाठी मिळकतींचे मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाचे प्रमुख उपायुक्त माधव जगताप यांनी दिली.