PMC Pune Tendernama
पुणे

Pune : शहरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिका खर्च करणार 7 कोटी 29 लाख

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुण्यात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढल्याने आजारांना निमंत्रण मिळत आहे. दुचाकीस्वारांचे चेहरे तर धुळीने काळवंडत आहेत. यामुळे पुणेकर त्रस्त झालेले आहेत. यावर उपाय म्हणून महापालिका रस्त्यावर पाण्याची फवारणी करून हवा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यासाठी ७ कोटी २९ लाख रुपये खर्च करून पाच अद्ययावत गाड्या घेतल्या जाणार आहेत. एक गाडी एका दिवसात किमान ८० किलोमीटर रस्त्यावर पाण्याची फवारणी करू शकणार आहे.

पुणे शहराच्या विविध भागांत सुरू असलेले बांधकाम प्रकल्प, उड्डाण पूल, भुयारी मार्ग, रस्ते, मेट्रो प्रकल्प आदींची कामे सुरू आहेत. शहरात दिवसरात्र सिमेंट, खडी, माती यांची वाहतूक करणारी वाहने धावत आहेत. त्यामुळे शहरात धुळीचे प्रमाण प्रचंड वाढलेले आहे. आरएमपी प्लांटमधील वाहने किंवा डंपर हे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या नियमांचे पालन करत नसल्याने नागरिकांना या धुळीचा त्रास होत आहे. हिवाळ्यामध्ये तर धुळीच्या त्रासाने अनेकांना श्‍वसनाचाही त्रास होतो. त्यामुळे धुळीचा मुद्दा गंभीर बनवलेला आहे. केंद्र सरकारने पुणे महापालिकेला १५व्या वित्त आयोगातून २०२१ ते २०२६ या कालावधीत धुळीवर नियंत्रण आणण्यासाठी विविध प्रकल्प व उपाययोजना करण्यास सांगितले आहे. यासाठी ३५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वी घनकचरा विभागाने राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून (नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम) धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी ८० लाख ९ हजार रुपये खर्च करून तीन गाड्या घेतल्या होत्या. पण त्यांचा तीन वर्षे वापर न झाल्याने त्या धूळ खात पडून होत्या. गेल्याच महिन्यात धूळ कमी करण्यासाठी या गाड्यांचा वापर करण्यासाठी ८४ लाख ९० हजार रुपयांचे टेंडर काढले आहे.

फवारणी पाण्याची, पण दिसणार धुके

धूळ कमी करण्यासाठी पर्यावरण विभागाने मोटर वाहन विभागाला सात कोटी २९ लाख ६८ हजार ८४० रुपयांची तरतूद उपलब्ध करून दिली होती. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. या वाहनाचे नाव ‘फॉग कॅनॉन मशिन माउंटेड व्हेइकल’ असे आहे. या गाडीमध्ये सहा हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी असते. मशिनच्या साह्याने पाण्याची फवारणी केली जाते त्या वेळी पाण्याचे अतिशय छोटे थेंब हवेत उडणार आहेत. ते धुके असल्याचाही नागरिकांना भास होऊ शकतो. या छोट्या थेंबामुळे हवेतील धुलीकणांचे प्रमाण कमी होऊन हवा स्वच्छ होते, असे मोटर वाहन विभागाचे उपायुक्त जयंत भोसेकर यांनी सांगितले.

एक कोटी ४५ लाखांची गाडी

देशभरातील अनेक महापालिका, तर राज्यातील पिंपरी चिंचवड, मीरा भाईंदर, नवी मुंबई या महापालिकांमध्ये या गाड्यांचा वापर करून धूळ कमी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आता पुणे महापालिकेतही या पद्धतीचा वापर केला जाणार आहे. मे. हायटेक सर्व्हिसेस या कंपनीकडून पाच परिमंडळासाठी पाच गाड्या घेण्यात आल्या असून या एका गाडीची किंमत ८९ लाख ७ हजार इतकी आहे. एका वर्षासाठी देखभाल दुरुस्तीसाठी ४८ लाख १८ हजार ५१४ रुपये इतका खर्च येणार आहे. ही एक गाडी महापालिकेला ‘जीएसटी’सह एक लाख ४५ लाखांच्या घरात पडलेली आहे.

जबाबदारी कोण घेणार?

सव्वासात कोटी रुपये खर्च करून महापालिका पाच गाड्या खरेदी करत आहे. पण या गाड्या परिमंडळाकडे हस्तांतरित केल्यानंतर त्यांच्यावर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियंत्रण असणार की पर्यावरण विभागाचे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या गाड्यांची जबाबदारी संबंधित परिमंडळाकडे दिल्यास त्यावर एका अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार नाही. त्यामुळे पुणे महापालिकेतील एका मुख्य खात्याकडे नियंत्रण देणे आवश्‍यक आहे.