पुणे (Pune) : शहरातील सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करून ते पुन्हा नदीत सोडण्यासाठी ‘जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी’च्या (जायका) सहकार्याने हाती घेतलेल्या प्रकल्पाला पुन्हा मुदतवाढ मागण्याची नामुष्की महापालिकेवर आली आहे. या प्रकल्पाचे आतापर्यंत ७० टक्केच काम झाल्याचा दावा करत आणखी एक वर्षाची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती महापालिकेने केंद्र सरकारकडे केली आहे.
शहरात दररोज एक हजार ७५० एमएलडी पाण्याचा वापर होतो. त्यातील एक हजार ४०० एमएलडी मैलामिश्रित पाणी निर्माण होते. त्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिकेने शहरात विविध ठिकाणी नऊ सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) बांधले आहेत. या प्रकल्पांमध्ये दररोज ३६७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते. उर्वरित सांडपाणी थेट नदीत मिसळते. या पार्श्वभूमीवर शहरात निर्माण होणाऱ्या सांडपाण्यावर शंभर टक्के प्रक्रिया करण्यासाठी एक हजार कोटी रुपये खर्चून ११ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प महापालिकेने हाती घेतला आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीने जायका कंपनीकडून अनुदान स्वरूपात महापालिकेला ८५० कोटी रुपये परत न देण्याच्या बोलीवर मिळणार आहेत. त्यासाठी महापालिका, केंद्र सरकार आणि जायका यांच्यात प्रशासकीय मान्यतेचा त्रिपक्षीय करार १६ जानेवारी २०१६मध्ये झाला होता. त्यानुसार पुण्यात ११ ठिकाणी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारणे आणि सांडपाणी वितरण व्यवस्था निर्माण करणे अपेक्षित आहे. हा प्रकल्प सहा वर्षांत म्हणजे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत महापालिकेने पूर्ण करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रकल्पासाठीच्या जागा आणि टेंडर प्रक्रियेतील घोळामुळे प्रकल्पाची मुदत ३१ जानेवारी २०२२ला संपुष्टात आली.
दरम्यान, महापालिका, केंद्र सरकार आणि जपान सरकार यांच्यात झालेल्या त्रिपक्षीय करारास मुदतवाढ द्यावी, असा प्रस्ताव महापालिकेने २०२२मध्ये केंद्र सरकारकडे पाठविला आहे. त्यास सरकारकडून मुदतवाढ देण्यात आली. ती या महिन्यात संपुष्टात येत आहे. या मुदतीतही महापालिकेकडून प्रकल्पाचे काम पूर्ण झालेले नाही. सद्यःस्थितीत या प्रकल्पांतर्गत आंबिल ओढा, भैरोबा नाला, माणिक नाला, कोथरूड, वारजे आणि हडपसर नाला या शहरातील प्रमुख सहा ओढे व नाल्यांमधील पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी विठ्ठलवाडी, नायडू (जुना), नायडू (नवीन), भैरोबा नाला, मुंढवा, खराडी, तानाजीवाडी, बोपोडी, बाणेर, कोथरूड आणि कृषी महाविद्यालयातील बॉटनिकल गार्डन या ११ ठिकाणी एसटीपी प्रकल्प, ५५ किलोमीटर मैलापाणी वाहिन्या टाकण्याचे काम सुरू आहे. दहा ठिकाणी एसटीपी प्रकल्पांची कामे सुरू असून, बॉटनिकल गार्डनमधील काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे पुन्हा मुदतवाढ मागण्याची वेळ महापालिकेवर आली आहे.
‘‘या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याची मुदत मार्च २०२५पर्यंत आहे. मात्र, प्रकल्पांतर्गत उभारण्यात येणाऱ्या एसटीपी प्रकल्पांची कामे आतापर्यंत ७० ते ८० टक्केच पूर्ण झाली आहेत. त्यामुळे या कामाला आणखी एक वर्षाची म्हणजे मार्च २०२६पर्यंत मुदतवाढ मागितली आहे.’’
- डॉ. राजेंद्र भोसले, आयुक्त, पुणे महापालिका