Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune : चांदणी चौकातील पुलाच्या उद्‍घाटनानंतर पालिकेला उपरती, आता...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौकातील उड्डाणपुलाचे मोठा गाजावाजा करून उद्‍घाटन झाले, पण पादचाऱ्यांसाठी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी त्यांना जीव धोक्यात घालून चौक ओलांडावा लागत आहे. यामुळे पुणे महापालिकेने अखेर बहुपर्यायी आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. चौक ओलांडणे, बावधन-कोथरूडकडे ये-जा करणे, बस थांब्यापर्यंत पोहोचणे अशी व्यवस्था त्यामुळे होईल.

महामार्ग ओलांडण्यासाठी पूल उभारणे, बस रिक्षा स्टँडची व्यवस्था करणे, बाहेरगावावरून येणाऱ्या एसटी बस, खासगी बस यांच्यासाठी योग्य ठिकाणी थांबे करणे यादृष्टीने नियोजन सुरू केले आहे. प्रत्यक्ष जागेवर जाऊन, उपलब्ध जागा आणि रस्ते यांचा विचार करून आराखडा तयार केला जाईल. त्यास मान्यता मिळाल्यानंतर पुढील कामाला सुरवात होईल. उड्डाणपुलाचे काम गेल्या सहा वर्षांपासून सुरु होते. चांदणी चौक परिसरात आठ रॅम्प आहेत. कुठला रस्ता नेमका कुठे जातो हे कळत नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडतो आहे. मोठ्या व स्पष्ट अक्षरात दिशादर्शक फलक लावण्याची मागणी केली जात आहे. पादचाऱ्यांसाठीही व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नवीन पादचारी मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे. पण त्यास अद्याप केंद्र सरकारची मान्यता मिळालेली नाही.

चांदणी चौकातून रोज लाखो वाहने धावतात. या चौकात शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, कामगार, महिला अशा पादचाऱ्यांची संख्या मोठी आहे. मुंबई, सातारा, कोकणातून येणारे प्रवासीही या चौकात उतरतात. तेव्हा ते महामार्ग ओलांडण्यासाठी धोका पत्करून लोखंडी दुभाजकावरून उडी मारत शॉर्टकट घेतात. ज्यांना हे शक्य नाही त्यांना अर्धा किलोमीटरचा वळसा घालून रस्ता ओलांडावा लागत आहे.

पाच मार्गांवर मोठे नकाशे

चांदणी चौकात आल्यानंतर वाहनचालकांचा गोंधळ उडू नये म्हणून कोथरूड, मुळशी, बावधन, सातारा व मुंबईकडे जाणाऱ्या प्रत्येक रस्त्यावर मोठे आणि सुटसुटीत नकाशे लावले जातील. दिशादर्शक फलकांचाही यात समावेश आहे. या कामासाठी महापालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे, असे महापालिकेचे वाहतूक नियोजन अधिकारी निखिल मिजार यांनी सांगितले.