पुणे (Pune) : शहरातील रस्त्यांची दुरवस्था झाल्याने दुरुस्ती व डांबरीकरणासाठी महापालिका प्रशासनाने १६ कोटी ३८ लाख रुपयांचे टेंडर काढले आहेत. हे टेंडर २० ते ३५ टक्क्यांपर्यंत कमी दराने आल्या आहे. त्यामुळे ठेकेदारांकडून चांगल्या दर्जाची कामे केली जातील का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
शहरात पाणी पुरवठा, सांडपाणी वाहिनी, पावसाळी गटार, मोबाईल कंपन्यांच्या केबल, गॅस वाहिनी टाकणे यासह अन्य कारणासाठी रस्ते खोदले जातात. काम झाल्यानंतर पुन्हा त्या ठिकाणी डांबर टाकून हे खड्डे बुजविले जातात. पण काही दिवसांनी खोदलेल्या रस्त्याचा भाग खचल्याने रस्त्यावर खड्डे पडण्यास सुरुवात होतात. तसेच पावसाळ्यामध्ये अनेक रस्त्यांवर खड्डे पडतात, खडी निघून गेल्याने चाळण झालेली असते. पावसाळ्यात महापालिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. पण तरीही रस्ते ओबडधोबड, असमान पातळीमध्ये असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास होतो, वाहतुकीची गती मंदावते. विशेषतः अशा रस्त्यांचा सर्वाधिक त्रास दुचाकीस्वारांना होतो. पथ विभागाने शहरातील जवळपास सर्वच भागातील प्रमुख रस्त्यांसह अन्य रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यातील पात्र ठेकेदारांचे प्रस्ताव स्थायी समितीच्या मान्यतेसाठी ठेवण्यात आलेले आहेत.
कामे व टेंडर कमी दराने आलेली टक्केवारी
- येरवडा पोस्ट ऑफिस ते मनोरुग्ण रुग्णालय (२३.७५ टक्के)
- वडगाव बुद्रुक इंडियन ह्यूम पाइप ते प्रयेजा सिटी (१८.७०)
- वाघोली येथील बावडी रस्ता महापालिका हद्दीपर्यंत (२३.९१)
- शहराच्या पूर्व भागातील रस्ते विविध ठिकाणी मिलिंग करणे (३५.०५)
- वाघोली येथे ३० मिटर रुंदीचा बाह्यवळण रस्ता विकसित करणे (२४.११)
- वारजे शिंदे पूल ते कोंढवा गेट कॅनॉलपर्यंत रस्ता करणे (३.३)
- महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेले मांगडेवाडी, भिलारेवाडी, कोलेवाडी, जांभूळवाडी गावातील रस्ते विकसित करणे (२२.१०)
- साडेसतरा नळी साधना बँक रस्ता करणे (२)
- कात्रज परिसरातील शेलार मळा रस्ता करणे (१२),
- साई एन्क्लेव सोसायटी ते सुतारवाडीला जोडणारा रस्ता करणे (१९.०१)
- केशवनगर लोणकर चौक ते रेणुका माता मंदिराला जोडणारा रस्ता (२४.२७)
- मांगडेवाडी गावातील मुख्य रस्ता डांबरीकरण करणे (२३.८५)
- कोंढवा मुख्य रस्ता कोणार्क पूरम लगत डीपी रस्ता (२३.५५)
- कर्वेनगर वरघडे चौक ते डीपीपर्यंतचा रस्ता (२५.२६)
- १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील रस्ते रिसरफेसिंग करणे (२०.८१)
ठेकेदारांमधील स्पर्धेचा परिणाम
पुणे महापालिकेत ठेकेदारांमध्ये काम मिळविण्यासाठी मोठी स्पर्धा आहे. पथ विभागाच्या निविदा या मोठ्या रकमेच्या असतात. हे काम मिळाल्यास त्यांना मोठ्या रकमेचे काम केल्याचा अनुभव मिळतो व त्या आधारावर ते पुढच्या आणखी मोठ्या रकमेचे टेंडर भरण्यास पात्र ठरतात. त्याच प्रमाणे सरकारकडे व महापालिकेकडे काम जास्त मिळत नसल्याने प्रत्येक निविदेसाठी मोठी स्पर्धा होते. ठेकेदाराला कंपनीचा खर्च भागविण्यासाठी कमी नफा झाला तरी काम मिळवणे आवश्यक असते असे अधिकारी सांगत आहेत. तर काही ठेकेदार कमी रकमेच्या निविदा भरून त्यांची रिंग यशस्वी करून आपसांत कामे मिळतील अशी व्यवस्था करतात.
दर्जा राखण्याची जबाबदार आमची
पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर म्हणाले, ‘‘महापालिकेने तयार केलेले पूर्वगणनपत्रक बरोबर आहे. पण ठेकेदारांनी कमी दराने टेंडर भरली तरी त्यांना काम द्यावे लागते. रस्त्याची कामे निकृष्ट दर्जाची होणार नाहीत, त्याचा दर्जा हा उत्तमच असला पाहिजे व तशी कामे करून घेण्याची जबाबदारी आमची आहे. तसेच प्रत्येक कामाचे इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड (इआयएल) या संस्थेकडून तपासणी केली जाते. त्यांचे योग्यता प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय काम अंतिम होत नाही. शहरातील रस्ते यामुळे उत्तम स्थितीत असतील.’’