Street Light Tendernama
पुणे

Pune : अखेर सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल रविवारी खुला होणार?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) - सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटरपर्यंतच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले आहे. आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी नुकतीच या उड्डाणपुलावर दुचाकीवरून फेरी मारून पाहणी केली. या उड्डाणपुलाच्या उ‌द्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहण्याची शक्यता असून, हा कार्यक्रम रविवारी (ता. २७) होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुणे महापालिकेने ११८ कोटी रुपये खर्च करून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ते फनटाइम थिएटर दरम्यान तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले. यातील राजाराम पूल चौकातील ६५० मिटर लांबीच्या उड्डाणपुलाचे उद्घाटन काही महिन्यांपूर्वी झाले. त्यानंतर आता २१२० मिटर लांबीचा विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असून, तो उद्घाटनाच्या प्रतिक्षेत आहे. तर माणिकबाग ते हिंगण्यातील पेट्रोलपंप दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम सुमारे ७० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम पूर्ण होण्यास अजून दोन महिने लागणार आहेत.

विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर या दरम्यानच्या उड्डाणपुलाचे काम मार्च अखेरीस पूर्ण झाले, पण पथदिवे व दिशादर्शक फलक लावणे यासाठी एक महिना लावण्यात आला आहे. या पुलाच्या उद्घाटनासाठी मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने हा पूल खुला करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. 'सकाळ'ने याबाबत वृत्त प्रकाशित केले होते. दरम्यान त्यानंतर आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी या उड्डाणपुलाची पाहणी केली, त्यात किरकोळ दुरुस्ती सुचविल्या असून ते काम ८ दिवसांच्या आत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. हा उड्डाणपूल २७ एप्रिल रोजी खुला केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी समाज माध्यमावर या उड्डाणपुलाचा व्हिडिओ शेअर करून 'औपचारिक उद्घाटनाची वाट न पाहता हा रस्ता नागरिकांच्या वापरासाठी खुला करावा. जेणेकरून वाहतूक कोंडी सुटण्यास मोठी मदत होईल.' अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.