Traffic
Traffic Tendernama
पुणे

Pune Traffic: बाणेर, कोथरूडकरांची कोंडीतून सुटका; आता बोगद्यातून..

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पाषाण, कोथरूड आणि गोखलेनगर यांना जोडणाऱ्या पाषाण (पंचवटी) ते कोथरूड (सुतारदरा) या दरम्यानच्या बोगद्याच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण होऊन व्यवहार्यता तपासणी अहवाल (फिजिबिलिटी रिपोर्ट) तयार करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच हा अहवाल महापालिकेला सादर करण्यात येणार आहे. बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर पाषाण, बाणेरबरोबरच गणेशखिंड रस्ता परिसरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यास मदत होणार आहे.

महापालिकेकडून विकास आराखड्यात सिंहगड रस्ता ते सहकारनगर आणि पंचवटी ते सुतारदरा या दरम्यान दोन बोगद्यांचे काम प्रस्तावित आहे. त्यापैकी पंचवटी ते सुतारदरा या दरम्यान बोगद्याच्या कामाचा अहवाल तयार करण्यात आला असून, टेंडर काढण्यात आले आहे.

या कामाचा आढावा नुकताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला. कामाला गती देण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार या बोगद्याच्या कामाचे सर्वेक्षण पूर्ण करून व्यवहार्यता तसापणी अहवालाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या प्रकल्पासाठी ४८६ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, पुढील महिन्यात हा अहवाल महापालिकेला प्राप्त होईल, असे महापालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

बोगदा झाल्यानंतर
- बोगदा पूर्ण झाल्यानंतर पाषाण व बाणेर परिसरातील नागरिकांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, गणेशखिंड रस्त्यावरील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळून थेट कोथरूड आणि सेनापती बापट रस्त्यावर जाता येणार आहे.
- चांदणी चौक, गणेशखिंड रस्त्यावरील आचार्य आनंदऋषी चौक, नळस्टॉप आणि गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे.
- गणेशखिंड रस्त्याला समांतर असा पर्यायी रस्ता निर्माण होणार
- वाहतुकीची कोंडी कमी झाल्याने प्रदूषणाची पातळी नियंत्रित होण्यास मदत
- नागरिकांना सोयीस्कर आणि वेळ वाचवणारा मार्ग उपलब्ध होणार
- शहरातील पूर्व, नैऋत्य परिसरातील तसेच शहरातील मध्यवर्ती वस्तीतील नागरिकांना पश्चिम आणि वायव्य परिसराकडे जाणे सुलभ
- बोगद्यामुळे वेताळ टेकडीवरील पशुपक्षी आणि एकूणच निसर्गाला कमीत कमी अडथळा करून वाहतूक सोयीची होणार
- हिंजवडी, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण येथे कामावर जाणाऱ्यांच्या वेळेत बचत होणार
- वाहतुकीची घनता कमी होणार असल्याने वाहनांची कार्यक्षमता वाढून इंधनाचा वापर आणि पर्यायाने होणारा खर्च कमी होईल

- बोगद्याची एकूण लांबी - १५२० मीटर
- पाषाण ते सुतारदरा (कोथरूड टी-१) बोगद्याची लांबी- ९६० मीटर
- पाषाण ते गोखलेनगर (शिवाजीनगर टी-२) बोगद्याची लांबी- ५६० मीटर
- बोगद्याची रुंदी - २४ मीटर
- बोगद्यातून जाणारे रस्ते - सहापदरी (दोन्ही)
- बोगद्याची उंची - ६ मीटर
- प्रकल्पाचा खर्च - ४८६ कोटी