traffic Tendernama
पुणे

Pune : वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी राबविण्यात येणारी ‘मिशन-15’ मोहीम नक्की आहे तरी काय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या पथ विभागाच्या समन्वयातून ‘मिशन-१५’ मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात शहरातील १५ प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक कोंडी सोडविण्यासह सुरक्षिततेच्या दृष्टीने कामे सुरू करण्यात आली आहेत. तीन आठवड्यांत हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर लगेचच उर्वरित १७ रस्त्यांवरही ही मोहीम राबविण्यात येणार आहे.

अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी शनिवारी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या वेळी पोलिस उपायुक्त संदीप भाजीभाकरे, महापालिकेतील अधीक्षक साहेबराव दांडगे, मेटा आर्च कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद रोडे, वाहतूक शाखेतील पोलिस निरीक्षक सुनील गवळी, सुनील पंधरकर, धनंजय पिंगळे आदी उपस्थित होते.

सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीत सुधारणा

सोलापूर रस्त्यावरील वानवडी आणि हडपसर परिसरातील गोळीबार मैदान ते रवीदर्शनदरम्यान रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडविण्यात शहर वाहतूक पोलिस आणि महापालिकेच्या पथ विभागाने एकत्रित प्रयत्न केले. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त अमोल झेंडे, वाहतूक शाखेतील अधिकारी तसेच, पथ विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांच्याकडून वाहतुकीत सुधारणा करण्यात येत आहेत. रामटेकडी चौक, काळुबाई चौक, सोपानबाग चौक, फातिमानगर भैरोबानाला, गोळीबार मैदान, वैदवाडी, मगरपट्टा, हडपसर वेस, गाडीतळ आणि रवीदर्शन चौक या रस्त्यांवरील खड्डे, ड्रेनेज, चेंबर, पावसाळी गटारे, गतिरोधक, तुटलेले दुभाजक, सिग्नल यांची दुरुस्ती करण्यात आली. या उपाययोजनांमुळे चार दिवसांपासून सोलापूर रस्त्यावरील कोंडी दूर झाल्याने वाहतुकीचा वेग १५ ते २५ टक्क्यांनी वाढला आहे, असे मनोज पाटील यांनी सांगितले.

शहरात एमएनजीएल व एमएसआरडीसी या विभागांकडून समान पाणीपुरवठा, सांडपाणी वाहिनीची कामे सुरू आहेत. आगामी काळात या सर्व विभागांशी समन्वय ठेवून कामे करण्यात येतील. रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यासह रात्रीचे अपघात टाळण्यासाठी विद्युत विभागाकडून चांगल्या दर्जाचे पथदिवे लावण्यात येतील, असे मुख्य अभियंता पावसकर यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यातील १५ रस्ते

नगर रस्ता, सोलापूर रस्ता, मगरपट्टा रस्ता, पाषाण रस्ता, बाणेर रस्ता, संगमवाडी रस्ता, विमानतळ व्हीआयपी रस्ता, कर्वे रस्ता, पौड रस्ता, सातारा रस्ता, सिंहगड रस्ता, बिबवेवाडी रस्ता, नॉर्थ मेन रस्ता, गणेशखिंड रस्ता आणि छत्रपती शिवाजी महाराज रस्ता- बाजीराव रस्ता हेरिटेज वॉक.