पुणे (Pune): गेल्या अनेक वर्षांपासून पुणेकरांचा दाटीवाटीने सुरू असलेला पुणे-मुंबई, मुंबई-पुणे प्रवास आणखी काही महिने तसाच सुरूच राहणार आहे.
‘डेक’चे काम अपूर्ण
सीएसएमटी स्थानकावरील ११ व १२ क्रमांकाच्या फलाटांची लांबी वाढविण्याचे काम पूर्ण झाले आहे; मात्र अद्याप ‘आयआरएसडीसी’च्या (इंडियन रेल्वे स्टेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन) वतीने सीएसएमटी स्थानकावरच ‘डेक’ बनविण्याचे काम पूर्ण झालेले नाही. ते पूर्ण झाल्यानंतरच पुण्यातून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांचे डबे वाढविले जाणार आहे. मात्र त्यासाठी आणखी किमान दीड ते दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे.
प्रगती, सिंहगड व डेक्कन क्वीन एक्स्प्रेसला डबे वाढविण्यासाठी पुण्याच्या परिचालन विभागाने मुख्यालयाला प्रस्ताव दिला. त्या वेळी मुंबईत त्या लांबीचे फलाट नाही, असे कारण मध्य रेल्वे प्रशासनाने दिले. मागच्या काही महिन्यांत फलाट ११ व १२ चे विस्तारीकरण पूर्ण झाले. मात्र ‘डेक’चे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांना आणखी किमान दोन वर्ष वाट पाहावी लागणार आहे. याचा फटका प्रवाशांना बसणार हे नक्की.
तीन डबे वाढविण्याचा प्रस्ताव
डेक्कन क्वीन, प्रगती व सिंहगड एक्स्प्रेस या तीन रेल्वे गाड्यांना प्रवाशांची नेहमीच मोठी गर्दी असते. दररोज सुमारे दीड ते दोन हजार प्रवासी या प्रत्येक गाडीतून प्रवास करतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून डब्यांची संख्या वाढविण्याची मागणी प्रवासी व प्रवासी संघटना करीत आहेत. मात्र रेल्वे प्रशासन नेहमीच कोणते तरी कारण पुढे करीत असमर्थता दर्शविते. एक डबा जरी वाढला तरी किमान दीडशे प्रवाशांची सोय होते. डबे वाढत नसल्याने किमान दीड ते दोन हजार प्रवाशांना फटका बसत आहे.
पुण्यातही फलाटांची लांबी वाढविणे गरजेचे
सिंहगड एक्स्प्रेस (१८ डबे), प्रगती व डेक्कन क्वीन एक्स्प्रेस (१७ डबे) या गाड्यांच्या डब्यांची संख्या कमी असल्याने प्रामुख्याने याला ४ किंवा ५ क्रमांकाच्या फलाटावरून सोडतात. चार आणि पाच फलाटांची लांबीदेखील कमी आहे. या गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढल्यास फलाटांची लांबीदेखील वाढवावी लागणार आहे. तेव्हा रेल्वे प्रशासनाने या दीड वर्षात पुण्यातील फलाटांची लांबी वाढविणे अपेक्षित आहे.
सीएसएमटी स्थानकावरील फलाटांची लांबी वाढविण्यात आली आहे. सध्या ‘आयआरएसडीसी’च्या वतीने सीएसएमटी स्थानकावर ‘डेक’चे काम सुरू आहे. ते पूर्ण होताच गाड्यांना डबे वाढविले जातील.
- डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई