पिंपरी (Pimpri) : पार्किंगच्या गैरसोयीसह काही स्थानकांवरील पादचारी पुलाचे अपूर्ण काम, एस्केलेटरचा अभाव, बंद असलेले नियोजित प्रवेशद्वार तर काही स्थानकातील गर्दीमुळे लिफ्टवर ताण पडल्याने वाट बघत बसायची वेळ प्रवाशांवर येत असल्याने प्रवाशांना पिंपरी ते दापोडी मेट्रो स्थानकादरम्यान गैरसोयीचा त्रास सहन करावा लागत आहे.
पिंपरी ते दापोडीनंतर आता पिंपरी ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रोच्या कामाला सुरवात झाली आहे. या मार्गातील पिलरचे काम पूर्णत्वास होण्याच्या मार्गात असून, सेंगमेंट बसविण्याला सुरूवात झाली आहे. महामेट्रो नवनव्या मार्गीकेचे काम हाती घेत असले तरी जुन्या स्थानकातील कामे मात्र अपूर्ण अवस्थेत आहेत.
यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याकडे महामेट्रोने प्रथम प्राधान्य देऊन अपूर्ण कामे पूर्णत्वास न्यावीत, अशी मागणी पिंपरी-चिंचड शहरावासीयांकडून होत आहेत.
पीसीएमसी स्थानक
या स्थानकातून सर्वांधिक प्रवाशी वाहतूक होत असल्याने पार्किंग समस्या मोठी बनली आहे. तसेच या ठिकाणच्या नियोजित पादचारी पुलाच्या कामास विलंब झाला आहे. त्यामुळे उशिराने या कामाला सुरवात झाली.
परिणामी, अद्याप काम अपूर्ण अवस्थेत असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन मोरवाडी चौक पार करावा लागत आहे. तसेच स्थानकात एस्केलेटरचा अभाव असल्याने अबाल वृद्धांना पायऱ्यांचा वापर करून चढ-उतार करावा लागत आहे.
संत तुकारामनगर स्थानक
या स्थानक परिसरात शहरातील एसटीचे आगार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह ज्येष्ठांचीही मोठी गर्दी स्थानकात होते. त्यामुळे पार्किंगची समस्या हा मोठा प्रश्न उद्भवत आहे. तसेच येथील लिफ्टवर ताण पडत असल्याने प्रवाशांना बराच वेळ लिफ्टची वाट बघावी लागत आहे. प्रवेश आणि एस्केलेटर बंद अवस्थेत आहेत.
भोसरी स्थानक
भोसरी स्थानकातील एस्केलेटर बंद अवस्थेत असून, चारही बाजूंनी पदपथाचे काम सुरू आहे. परिणामी प्रवाशांना स्थानकात ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानकामधून खाली उतरताना धुळीचा त्रास सहन करावा लागत आहे. हे काम संथगतीने सुरू असल्याने प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
कासारवाडी स्थानक
पादचारी पूल आणि एस्केलेटरची कामे अपूर्ण आहेत. तसेच या ठिकाणी असलेल्या गॅरेजचालकांनी दुरूस्तीसाठी असलेली वाहने प्रवेशद्वाराजवळ पार्क करीत असल्याने प्रवाशांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे.
फुगेवाडी स्थानक
या ठिकाणी एस्केलेटर अरूंद अवस्थेत आहेत. त्यामुळे प्रवासातील साहित्य घेवून जाताना प्रवाशांना अडचणी निर्माण होत आहेत. तसेच पार्किंग समस्या असल्याने प्रवाशी त्रस्त आहेत.
दापोडी स्थानक
दापोडी येथे प्रवेशद्वाराजवळ वाहने पार्क केली जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना ये-जा करताना समस्या उद्भवत आहेत. तसेच अरूंद एस्केलेटरमुळे प्रवाशांना साहित्य घेवून जाताना अडचणी येत आहेत.
शहरातील काही मेट्रो स्थानकांना एकापेक्षा अधिक प्रवेशद्वार नियोजित आहेत. काही पीसीएमसी, नाशिक फाटा येथील पादचारी पुलाचे काम सुरू आहे. तसेच दापोडी, फुगेवाडी येथील पादचारी पुलाचे काम सुरू आहे. वर्षभरात उर्वरित कामे पूर्ण केली जातील.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, पुणे मेट्रो