Pune
Pune Tendernama
पुणे

Pune : 'या' कारणांमुळे लटकली पुणे मेट्रो

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते भूमीपूजन झालेला मेट्रो प्रकल्प (Pune Metro) तीन वर्षांत पूर्ण करण्याची तयारी महामेट्रोने (Maha Metro) केली होती. परंतु कोरोनाच्या दोन वर्षांमुळे हा प्रकल्प लांबला. त्या वेळी डिसेंबर २०२२ पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल, असे महामेट्रोने जाहीर केले. परंतु विविध प्रकारच्या अडथळ्यांच्या शर्यतीमुळे हा प्रकल्प लांबला आहे, असे महामेट्रोचे म्हणणे आहे.

मोदी यांच्याच हस्ते वनाज-गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी-फुगेवाडी या मार्गांचे गेल्या वर्षी उद्‍घाटन झाले. त्या वेळी डिसेंबर २०२२ पर्यंत पुढील मार्ग सुरू होईल, अशी ग्वाही देण्यात आली होती. परंतु अद्याप हे मार्ग सुरू झालेले नाहीत.

सध्याचे मेट्रो मार्ग

- वनाज-गरवारे कॉलेज (५ किलोमीटर), पिंपरी-फुगेवाडी (७ किलोमीटर)

- पुढचा मार्ग १ गरवारे कॉलेज - शिवाजीनगर न्यायालय (३ किलोमीटर) ः स्थानके - डेक्कन जिमखाना, संभाजी उद्यान, महापालिका भवन आणि शिवाजीनगर न्यायालय. स्थानकांची कामे ९५ टक्के पूर्ण झाल्याचा महामेट्रोचा दावा

- २ फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय (७ किलोमीटर) ः स्थानके - फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय. स्थानकांची कामे ८५ टक्के पूर्ण झाल्याचा महामेट्रोचा दावा

महामेट्रोचे दावे

- गरवारे कॉलेज-शिवाजीनगर न्यायालय, फुगेवाडी-शिवाजीनगर न्यायालय, शिवाजीनगर न्यायालय-रुबी हॉल, रेंजहिल्स-शिवाजीनगर भुयारी मार्ग, शिवाजीनगर-शिवाजीनगर न्यायालय भुयारी मार्ग या मार्गांवर मेट्रो ३१ मार्चपर्यंत धावणार- शिवाजीनगर न्यायालय-स्वारगेट, रुबी हॉल-रामवाडी या मार्गांवर मेट्रो ३० जूनपर्यंत धावणार(वर नमूद केलेल्या मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर केंद्रीय रेल्वे सुरक्षा मंडळाची पाहणी होईल, त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र मिळाल्यावर मेट्रो सुरू कधी करायची, याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकार घेणार आहे.

प्रवाशांनी फिरविली पाठ

- ६ मार्च २०२२ ते ३ मार्च २०२३ दरम्यानचे मेट्रो प्रवासी ः १७ लाख ९३ हजार, उत्पन्न ः २ कोटी ५८ लाख ८२ हजार

- वनाज-गरवारे कॉलेज मार्गावरील प्रवासी ः १२ लाख ६५ हजार, उत्पन्न ः १ कोटी ८४ लाख

- पिंपरी-फुगेवाडी मार्गावरील प्रवासी ः ५ लाख २८ हजार, उत्पन्न ः ७४ लाख ८२ हजार

गेल्या वर्षभरात

- शिवाजीनगर-शिवाजीनगर न्यायालय भुयारी मार्गाचे काम ९५ टक्के पूर्ण- मंडई, कसबा पेठ या भुयारी स्थानकांचे ७० टक्के, तर भुयारी स्वारगेट स्थानकाचे काम ८० टक्के पूर्ण

- वनाज, रेंजहिल्स डेपोचे काम पूर्ण

- ३४ पैकी प्रत्येकी ३ डब्यांच्या १४ ट्रेन पुण्यात पोचल्या

- निगडी-फुगेवाडी आणि स्वारगेट-कात्रज हे मार्ग मंजुरीसाठी केंद्र सरकारकडे

मेट्रोच्या रखडलेल्या कामाचा उद्योग-व्यवसायांवर विपरित परिणाम होत आहे. तसेच सुरू असलेल्या मार्गांची उपयुक्तता नसल्यामुळे त्या मार्गांवर प्रवाशांनी पाठ फिरविली आहे. मेट्रोचे काम तातडीने पूर्ण होण्यासाठी राज्य व केंद्र सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे.

- ओमप्रकाश रांका, अध्यक्ष, कर्वे रस्ता व्यापारी असोसिएशन

शहराच्या मध्यभागात शनिवार, रविवारी खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे नागरिकांना वाहनांनी तर दूरच; पण साधे पायी चालणेदेखील अवघड झाले आहे. मेट्रो ही सोयीची आहे, असे सुरुवातीला वाटत होते; परंतु ती रखडत चालल्यामुळे तिचा त्रास असह्य होऊ लागला आहे.

- मंदार देसाई, देसाई बंधू आंबेवाले