पिंपरी (Pimpri) : पुणे (Pune), पिंपरी-चिंचवडचे (PCMC) नागरिक आणि आयटी कर्मचारी (IT Employee) ज्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, अशा हिंजवडी - शिवाजीनगर मेट्रो प्रकल्प (Hinjewadi Shivajinagar Metro Line) सुरू होण्यासाठी मार्च-२०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची चिन्हे आहेत.
या प्रकल्पाचे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झाले आहे. सप्टेंबरमध्ये मेट्रोची ट्रॅकवर चाचणी करण्यात येणार आहे. मात्र, काम पूर्ण होऊन मेट्रो कार्यान्वित होण्यात अवधी लागणार असल्याने मार्च-२०२६ प्रवास करता येणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून पुणे महानगर विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए PMRDA) हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो-३ या मार्गिकेचे काम हाती घेण्यात आले. २०२१ मध्ये मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली, २०२२ मध्ये प्रकल्पाचा पहिला खांब उभा राहिला.
‘पीपीपी’ तत्त्वावर विकसित होणारा हा पहिलाच मेट्रो प्रकल्प आहे. एकूण २३.३ किलोमीटरच्या या मार्गिकेवर एकूण २३ स्थानके आहेत. मेट्रोचे दोन ट्रेन सेट यापूर्वीच दाखल झाले आहेत. सध्या त्यांची तांत्रिक चाचणी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, प्रत्यक्ष रुळांवर चाचणी होण्यासाठी सप्टेंबर उजाडणार आहे.
‘आयटीयन्स’च्या नशिबी अजूनही
पिंपरी-चिंचवड व पुण्यातून हिंजवडीत येणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण; हिंजवडीतील खराब रस्ते, पावसाळ्यात साचणारे पाणी, त्यामुळे सततची वाहतूक कोंडी यामुळे येथे येणाऱ्या ‘आयटीयन्स’ला मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते.
हा मार्ग सुरू झाल्यानंतर अवघ्या काही मिनिटांमध्येच हिंजवडी- शिवाजीनगर हा प्रवास करणे शक्य होणार आहे. यामुळे ही वाहतूक कोंडी कमी होईल, अशी अपेक्षा ‘आयटीयन्स’कडून व्यक्त केली जात आहे. मात्र, या प्रकल्पाला आता विलंब होत असल्याने काही महिने तरी कर्मचाऱ्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार आहे.
शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो मार्गिकेची मुदत सतत वाढविली जात आहे. सध्या हिंजवडीतील वाहतुकीची स्थिती पाहता हे काम लवकर होणे गरजेचे आहे. कमीत कमी हिंजवडी ते बाणेर -बालेवाडी हा टप्पा सुरू केला, तरी काही प्रमाणात आयटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
- कर्नल योगेश जोशी, सचिव, हिंजवडी इंडस्ट्री असोसिएशन
हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या मार्गिकेसाठी सहा कोच म्हणजेच दोन मेट्रो सेट आधीच दाखल झालेले आहेत. त्यांची चाचणी येत्या सप्टेंबरमध्ये केली जाईल. त्यानंतर तांत्रिक त्रुटी दूर करून ही मार्गिका कार्यान्वित होईल. या सर्व कामाला आठ ते दहा महिने लागणार असून मार्च २०२६ मध्ये मेट्रो मार्गिका सुरू होईल, असे नियोजन आहे.
- रिनाज पठाण, मुख्य अभियंता, पीएमआरडीए