Railway
Railway Tendernama
पुणे

Pune: पुणे-लोणावळा लोकल शिवाजीनगरहून सुटणार; 'हा' आहे मुहूर्त...

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : शिवाजीनगर रेल्वे स्थानकांवर (Shivajinagar Railway Station) लोकलसाठी नवे टर्मिनल (New Local Terminal) बांधण्याचे काम पूर्ण झाले. काही दिवसांपूर्वी घेण्यात आलेल्या ब्लॉकमध्ये ओव्हरहेडचे काम पूर्ण केले आहे. नव्या फलाटावरून लोणावळ्यासाठी ३० जानेवारीपासून लोकल धावतील. त्यामुळे पुणे स्थानकवरून सुटणाऱ्या लोकलची संख्येत मोठी घट होणार आहे.

पुणे स्टेशनवरचा लोकलचा भार हलका करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शिवाजीनगर स्टेशनवर ईएमयू (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट अर्थात लोकल) टर्मिनल बांधण्याचा निर्णय घेतला. यासाठी ३३० मीटर लांबीचे नवीन फलाट तयार केले.यासाठी सुमारे १ कोटींचा खर्च करण्यात आला. हे टर्मिनल सुरू झाल्यावर लोणावळ्याला जाणाऱ्या सुमारे पंधरा लोकल शिवाजीनगर स्टेशनवरून सुटतील. परिणामी, पुणे स्टेशनवरून सुटणाऱ्या लोकलची संख्या कमी होईल.

केवळ ज्या लोकलला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळतो, त्याच लोकल पुणे स्टेशनवरून सुटतील. यामध्ये दुपारी पाचला पुण्याला पोहोचणाऱ्या लोकलचा समावेश आहे. पुणे -लोणावळा दरम्यान धावणाऱ्या लोकलच्या डब्याच्या संख्येत वाढ केली जाणार नाही. आता जी १२ डब्याची लोकल धावत आहे. तीच १२ डब्यांची लोकल धावणार आहे. लोकलच्या नव्या रेकसाठी पुणे रेल्वे प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहे. मात्र त्यास अद्याप यश आलेले नाही.

पुणे स्टेशनवरचा भार कमी व्हावा, यासाठी रेल्वे प्रशासन विविध स्तरांवर प्रयत्न करीत आहे. हडपसर टर्मिनल, खडकी टर्मिनल यासह शिवाजीनगर स्टेशवरचे ‘ईएमयू’ (लोकल) टर्मिनलदेखील याचाच भाग आहे. नव्या फलाटामुळे लोकलसाठी स्वतंत्र लाईन तयार झाली. त्यामुळे एक प्रकारच्या स्टॅब्लिंग लाइनसारखा त्याचा वापर होईल.

परिणामी, शिवाजीनगरवरचा फलाट एक व दोन हा मेल एक्स्प्रेससाठी मोकळा राहण्यास मदत झाली. ‘शिवाजीनगर स्थानकावरील लोकल टर्मिनलचे काम वेगाने सुरू आहे. फलाट व अन्य कामे पूर्ण झाली आहेत. जानेवारीअखेर पर्यंत हा फलाट वापरात येईल,’ अशी माहिती मध्य रेल्वेच्या पुणे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांनी दिली.

खासदार बापट यांच्या हस्ते उदघाटन

पुणे रेल्वे स्टेशन येथून परराज्यात लांब पल्याच्या गाड्यांनी तसेच पुणे-लोणावळा लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे पुणे रेल्वे स्टेशन वरील ताण कमी करण्यासाठी शिवाजीनगर, खडकी आणि हडपसर स्टेशन वरून लोकल तसेच बाहेर जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्यास सोडाव्यात, यासाठी खासदार गिरीश बापट यांनी रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता.

त्यानुसार शिवाजीनगर ते लोणावळा या मार्गावर पहिल्या टप्‍यात चार लोकल गाड्या सुरू होणार आहेत. याबाबतची सर्व तयारी झाली असून येत्या तीन चार दिवसांमध्ये खासदार बापट यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन होणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.