Mantralaya Tendernama
पुणे

Pune: लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाबाबत आरोग्य मंत्र्यांनी काय दिले आदेश?

Prakash Abitkar: लोहगाव (जि. पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या महिन्याभरात रुग्णालय लोकार्पणासाठी सज्ज करा

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai): लोहगाव (जि. पुणे) येथील उपजिल्हा रुग्णालयाचे प्रलंबित कामे युद्धपातळीवर पूर्ण करून येत्या महिन्याभरात रुग्णालय लोकार्पणासाठी सज्ज करावे, असे निर्देश सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.

आरोग्य सेवा आयुक्तालय, मुंबई येथे आरोग्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत हें निर्देश देण्यात आले. या बैठकीत लोहगाव उपजिल्हा रुग्णालय तसेच येरवडा येथील प्रादेशिक मनोरुग्णालयातील कामांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीस आमदार बापूसाहेब पठारे उपस्थित होते.

लोहगाव परिसरातील झपाट्याने वाढणारी लोकसंख्या, भविष्यातील विमानतळ विकास आणि प्रस्तावित रिंग रोड यांचा विचार करता लोहगाव रुग्णालयाची क्षमता 200 खाटांपर्यंत वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे. याबाबत आरोग्य विभाग सकारात्मक असून या विस्ताराचा समावेश बृहत आराखड्यात करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

यावेळी आमदार बापूसाहेब पाठारे यांनी लोहगाव उपजिल्हा रुग्णालयाला संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे नाव देण्याची मागणी केली. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या.

दरम्यान, लोहगाव उपजिल्हा रुग्णालय आणि येरवडा प्रादेशिक मनोरुग्णालय येथे आरोग्य उपसंचालक, पुणे व संबंधित अधिकाऱ्यांनी आमदारांच्या सोयीने प्रत्यक्ष पाहणी दौरा आयोजित करावा, असेही निर्देश देण्यात आले. लोकप्रतिनिधींच्या सूचनांनुसार कामांचा आढावा घेऊन संरक्षक भिंतीचे बांधकाम, अतिक्रमण हटविणे, वृक्षारोपण आणि इतर प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीस आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, नागरी आरोग्य अभियानाचे आयुक्त सुनील भोकरे, संचालक डॉ. विजय कंदेवाड, उपसचिव दिपक केंद्रे, उपसंचालक डॉ. भगवान पवार (पुणे) तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

लोहगाव आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुलभ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी हे रुग्णालय लवकरात लवकर सुरू करण्यावर शासनाचा भर असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.