tanker pune Tendernama
पुणे

Pune : महापालिकेच्या अनियंत्रित कारभारामुळे टँकरलॉबी फोफावलीय का?

PMC : नागरिकांचे घरे घेण्याचे स्वप्न पूर्ण होत असले, तरी या सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे.

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : पुणे शहरातील टँकरचालकांची मुजोरी आणि टँकरलॉबीवर महापालिकेचे कुठलेच नियंत्रण नसणे या कारणांमुळे पुणे शहरातील अनेक भागातील नागरिकांना पैसे देऊन टँकरचालकांच्या मनमानीचा सामना करणे भाग पडले आहे. लाखो रुपये खर्चून घर विकत घेणाऱ्या नागरिकांवर पाण्याच्या टँकरसाठी पुन्हा मोठा खर्च करण्याची नामुष्की आल्याची विदारक चित्र शहरातील अनेक भागात दिसून येते.

महापालिका पाणीपुरवठा करू शकत नाही, अन्य पर्यायही उपलब्ध नाहीत, मग अशा वेळी नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागते. महापालिकेच्या टँकर भरणा केंद्रावरून महिन्याला ३३ हजारपेक्षा जास्त टँकर भरून नेले जात आहेत.

खासगी टँकर भरणा केंद्रावर तर कोणतेही नियंत्रण नाही. अनेक जण कॅनॉलमधील पाणी चोरून विहिरीत टाकतात. त्यानंतर ते टँकरमध्ये भरून लूट करतात. नागरिकांनी शुद्ध पाण्याबाबत विचारणा करताच अरेरावी करून थेट टँकरचालक एकत्र येऊन त्या सोसायटीला पाणीच मिळू द्यायचे नाही, अशी व्यवस्था करतात.

या मुजोरीमुळे नागरिक हतबल झाले आहेत. त्यामुळे अनियंत्रित कारभारामुळे टँकरलॉबी फोफावली असल्याचे दिसते.

शहरात झपाट्याने बांधकामे होत आहेत. तशी लोकसंख्याही वाढत आहे. गेल्या काही वर्षात महापालिकेत ३२ गावेही समाविष्ट झाली. तेथील लाखो नागरिकांनाही पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर आली आहे. पाणीपुरवठ्याची यंत्रणा उभी करण्यासाठी आराखडे तयार केले आहेत. पण प्रत्यक्षात काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू होण्यास आणखी किमान पाच-सहा वर्षे लागणार आहे. या गावांमध्ये प्रचंड वेगाने मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहेत.

नागरिकांचे घरे घेण्याचे स्वप्न पूर्ण होत असले, तरी या सोसायट्यांमध्ये पाण्याचा प्रश्‍न गंभीर आहे. तर जुन्या हद्दीतही इमारतींचा पुनर्विकास होऊन नवीन इमारती उभारल्या जात आहेत. त्यामुळे पाण्याची मागणी वाढली आहे. त्या तुलनेत महापालिकेची यंत्रणा अपुरी पडत असल्याने शहराच्या जुन्या हद्दीतही अपुरा आणि कमी दाबाने पाणी दिले जात आहे.

समान पाणीपुरवठा योजनेतून नवीन जलवाहिनी टाकली, पाण्याच्या टाक्या बांधल्या, प्रत्येक सोसायटी-घराला पाण्याचे मिटर बसवले आहेत, पण अजूनही योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे पाणी वापरावर अद्याप नियंत्रण नाही.

टँकरचालकांच्या हद्दी...

शहरात टँकरची संख्या हजारोच्या घरात आहेत. शहरात किती टँकरचालक आहेत, याची नेमकी माहिती महापालिकेकडे उपलब्ध नाही. पण शहराच्या विविध भागात टँकरचालकांनी त्यांच्या व्यवसायाची हद्द निश्‍चित केली आहे. त्यामुळे ठराविक टँकर त्याच हद्दीत चालतात. टँकरचालक हद्दीचे उल्लंघन केल्यास त्यांच्यात वादविवादही होतात. या हद्दी निश्‍चित केल्याने नागरिकांना कमी पर्याय उपलब्ध राहात आहेत. त्यामुळे टँकरचालकांची मुजोरी सहन करून पाणी विकत घ्यावे लागत आहे.

टँकरचालक झाले नगरसेवक

टँकरच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात पैसा मिळत आहे. एकाच व्यक्तीचे अनेक टँकर पाणीपुरवठा करत असतात. तसेच, या टँकरचालकांना राजकीय वरदहस्त लाभत असल्याने त्यांची दादागिरी वाढत आहे. टँकरच्या व्यवसायातून मिळविलेल्या पैशावर काही कार्यकर्ते थेट नगरसेवकही झाल्याचे उदाहरणे पुण्यात आहेत.

‘एसटीपी’च्या टँकरसाठी वेगळ्या रंगाचा विसर

महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रातील (एसटीपी) शुद्ध केलेले सांडपाणी बांधकाम, उद्यानांसाठी वापरण्याचे आदेश काढण्यात आले. ‘एसटीपी’चे पाणी घेणारे टँकर आणि पिण्याचे पाणीपुरवठा करणारे टँकर यांच्यातील फरक नागरिकांना बघताचक्षणी कळणे आवश्‍यक आहे. यासाठी ‘एसटीपी’च्या टँकरसाठी विशेष रंग निश्‍चित करून तो टँकरवर लावला जाईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झाली नाही.

त्यामुळे खराडीतील ज्ञाती एलिसिया सोसायटीला टँकरचालकाने पिण्याचे पाणी म्हणून सांडपाणी पुरविल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दिवस-रात्र टँकर सुरूच...

उपनगरांत महापालिकेचे पाणी उपलब्ध नाही

तरी टँकरचालक पाणीपुरवठा करतात

टँकरचालक कॅनॉलमधील पाणी चोरून विहिरीत पाणी सोडतो

एक टँकर ८०० ते १३००-१५०० रुपयांपर्यंत

सोसायट्यांना दिवसाला १० ते ४० टँकर पाणी लागते

महिन्याला लाखो रुपये फक्त टँकरवर खर्च

सोसायट्यांचे देखभाल दुरुस्तीच्या कामाचे नियोजन बिघडले