पुणे (Pune) : देशात सर्वाधिक गतीने वाढणारे शहर म्हणून नावलौकिक असलेल्या पुणे महापालिकेच्या (PMC) उत्पन्नाची चाके रुतू लागली आहेत. (PMC Budget News Update)
एकाच वेळी सुरू असलेले भरमसाट मोठे प्रकल्प, वाढलेला महसुली खर्च यामुळे जमा-खर्चाचे ताळमेळ घालणे प्रशासनाला अवघड होत चालले आहे. त्याचे प्रत्यंतर चालू आर्थिक वर्षात मिळालेल्या उत्पन्नावरून दिसून आले आहे. एकीकडे अशी परिस्थिती असताना पुढील आर्थिक वर्षात एक हजार कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
कोणतीही करवाढ नाही, उत्पन्न वाढीसाठी नवीन कोणतेही स्रोत नाही, असे असतानाही चालू आर्थिक वर्षाच्या पुढील वर्षी एक हजार कोटी रुपयांनी उत्पन्न वाढेल, असा विश्वास आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले व्यक्त केला. वास्तविक महापालिकेचे आर्थिक वर्ष ३१ मार्च रोजी संपुष्टात येते. महापालिकेला ६ हजार ५०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. वर्षअखेर ८ हजार ४०० कोटी रुपयांचे उत्पन्न जमा होईल, असा अंदाज आयुक्तांनी व्यक्त केला. याचा अर्थ २५ दिवसांमध्ये १ हजार ९०० कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असा अप्रत्यक्ष दावा आयुक्तांनी केला आहे.
तरीदेखील चालू आर्थिक वर्षात आयुक्तांनी उत्पन्नाचा जो अंदाज व्यक्त केला होता, त्यापेक्षा आजअखेर ५ हजार १०० कोटी रुपयांची तूट उत्पन्नात आहे. जरी पंचवीस दिवसांत एक हजार नऊशे कोटी रुपयांचे उत्पन्न जमा झाले, तर ही तूट कमी होऊन ३ हजार २०० कोटी रुपयांवर येणार आहे. त्यामुळे यंदा महापालिकेच्या उत्पन्नात चाळीस टक्क्यांहून अधिक तूट असणार आहे.
आकडे काय सांगतात?
१) चालू आर्थिक वर्षात (२०२४-२५) ११ हजार ६०१ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत येणे अपेक्षित असताना आतापर्यंत केवळ ६ हजार ५०० कोटी (५५ टक्के) जमा
२) आर्थिक वर्ष संपण्यास अवघे २५ दिवस शिल्लक
३) या कालावधीत तब्बल १ हजार ९०० कोटी जमा होतील, असा आयुक्तांना विश्वास
४) तरीदेखील महापालिकेचे उत्पन्न हे जेमतेम ८ हजार ४०० कोटी रुपये होईल
५) त्यामुळे उत्पन्नात तीन हजार कोटींहून अधिकची तूट राहणार
उत्पन्न कसे वाढेल, हे गुलदस्तात
काही वर्षांतील महापालिकेच्या उत्पन्नाचा आढावा घेतला तर पुढील वर्षांच्या उत्पन्नात आठ टक्क्यांनीच वाढ अपेक्षित धरली आहे. ही जमेची बाजू असली तरी त्यासाठी उत्पन्न वाढीसाठी काय ठोस उपाययोजना राबविणार, याबाबत मात्र मौन बाळगण्यात आले आहे.
महापालिकेच्या मालकी हक्काच्या जागांच्या वापरातून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असा मोघम उल्लेख करण्यात आला आहे, तर वस्तू आणि सेवा कर (जीएसटी), मुद्रांक शुल्कापोटी मिळणारा एक टक्का, शासकीय अनुदान आणि कर्ज या भरवशावर उत्पन्नवाढ दर्शविली आहे.
उत्पन्न देणारी खाती मागे
मिळकत कर आणि बांधकाम विभाग ही महापालिकेचे उत्पन्न मिळवून देणारी दोन महत्त्वाची खाती आहेत; परंतु या खात्यांची चालू आर्थिक वर्षात कामगिरी सुमार राहिली आहे. चालू आर्थिक वर्षात मिळकत करातून २ हजार ५४६ कोटी रुपयांचे उत्पन्न अपेक्षित होते. जानेवारीअखेर १ हजार ६२५ कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे, तर बांधकाम परवानगी व विकसन शुल्कातून २ हजार ४९२ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित असताना जानेवारीअखेर केवळ १ हजार ३१२ कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.