पुणे (Pune) : सध्या सुट्यांचा काळ असल्याने अनेकांनी पर्यटनाचे बेत आखले आहेत. नागरिक खासगी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत असल्याने पुण्याच्या चारही बाजूच्या रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी होत आहे. विशेषतः पुणे - मुंबई द्रुतगती मार्गावर वाहनांची संख्या एक लाखाच्या पुढे गेली आहे. दररोजच्या वाहनांच्या तुलनेत ही संख्या सुमारे ४० हजारांनी वाढली आहे.
या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊ नये, या करिता महामार्ग पोलिसांनी द्रुतगती मार्गावर पार्किंग तास व ३० मिनिटांच्या ब्लॉकची उपाययोजना आखली आहे. शिवाय अवजड वाहनांकडून लेन कटिंग होणार नाही, यासाठी गस्त घालण्यास देखील सुरुवात केली आहे. यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यास मदत होत आहे.
द्रुतगती मार्गावर महामार्ग पोलिसांकडून अवजड वाहनांसाठी ‘पार्किंग तास’ची अंमलबजावणी केली जात आहे. यात अवजड वाहनांना पळस्पे व अमिटी विद्यापीठ जवळच्या भागात असलेल्या रस्त्याच्या एका बाजूला अवजड वाहनांना तीन तास थांबविले जात आहे. त्यामुळे चारचाकी वाहनांना मार्ग उपलब्ध होतो.
सकाळच्या सत्रात अवजड वाहने थांबवली जात आहेत. पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक असल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर बोरघाटात ३० मिनिटांचा ब्लॉक घेतला जात आहे. या ब्लॉक मध्ये मुंबईच्या दिशेने सर्व वाहने थांबवून मुंबईहून पुण्याला येणारी सर्व वाहने दोन्ही मार्गिकेवरून सोडली जातात.
३० मिनिटांनंतर दोन्ही मार्गिकेवरून मुंबईच्या दिशेने वाहने सोडण्यात येत आहेत आणि अवजड वाहने लेन कटिंग करून चारचाकी व ओव्हरटेक साठी रिकाम्या असलेल्या मार्गिकेमधून वाहतूक करू नये म्हणून महामार्ग पोलिस सातत्याने गस्त घालत आहेत. लेन कट करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे.
सातारा मार्गावर अतिरिक्त लेन
सातारा - पुणे मार्गावर वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चार अतिरिक्त मार्गिका वाहनांसाठी उपलब्ध केल्या आहेत. त्यामुळे सातारा - पुणे मार्गावर आता १४ मार्गिका उपलब्ध झाल्या असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशीच परिस्थिती पुणे - नाशिक मार्गावर देखील असते. त्यामुळे येथेही महामार्ग पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन केले जात आहे.
द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये या करिता नियोजन केले आहे. पार्किंग तास, ब्लॉक सह आम्ही सातत्याने गस्त घालत आहोत. गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची नेमणूक केली आहे. दोन जानेवारीपर्यंत हे नियोजन असणार आहे.
- तानाजी चिखले, पोलिस अधीक्षक, रायगड, महामार्ग पोलिस