Chandani Chowk
Chandani Chowk Tendernama
पुणे

Pune: ठरले तर! 25 जुलैला मिळणार चांदणी चौकातून Good News

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : चांदणी चौक येथे एनडीए व बावधनला जोडणाऱ्या पुलासाठी तब्बल ९३ गर्डरचा वापर केला जाणार आहे. हे काम सुमारे महिना भर चालणार आहे. यासाठी ५६ मीटरचे ९ तर २५ मीटर चे ८४ गर्डर, असे एकूण ९३ गर्डरचा वापर केला जाणार आहे. तयार होणारा पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. हे काम सुरू असताना रस्ते वाहतूक प्रभावित होऊ नये दोन्ही बाजूच्या सेवा रस्ता व रॅम्पचा वापर केला जाईल. चांदणी चौकातील संपूर्ण काम २५ जुलैपर्यंत संपेल.

वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चांदणी चौक येथे सुमारे ३९७ कोटी रुपये खर्चून १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार केले. यात रॅम्प, सेवा रस्ता, अंडरपास यांचा समावेश आहे. चांदणी चौक येथील एकूण कामांपैकी ९० टक्के काम पूर्ण झाले असून आता केवळ पुलाचे काम शिल्लक आहे. एक ते दीड महिन्यांत पूल बांधण्याचे काम होईल. यासह फलक, भिंतीवर वेगवेगळ्या संकल्पनेवर आधारित चित्रे, फिनिशिंगचे कामे केले जाणार आहे.

असा आहे नवीन पूल
बावधन-एनडीएला जोडणारा हा पूल १५० मीटर लांबीचा व ३२ मीटर रुंदीचा आहे. पूर्वीचा पूल हा ५० मीटर लांबीचा व २० मीटर रुंदीचा होता. पूर्वीच्या तुलनेत पुलाची लांबी व रुंदी यामध्ये वाढ झाली आहे. तसेच जुन्या पूलचा पिलर रस्त्याच्या मधोमध येत असल्याने वाहतुकीला अडथळा ठरत होता.

नव्या पुलासाठी मात्र बांधलेले पिलर हे रस्त्याच्या मधोमध नसून रस्त्याच्या दोन्ही बाजूला आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही. शिवाय वाहतुकीसाठी पिलरची जागा देखील उपलब्ध होत असल्याने वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल.

हे काम पूर्ण
१. कोथरूड हून मुळशी कडे जाणारा अंडरपास सोमवारपासून सुरू झाला. हा ८५० मीटरचा रस्ता असून, २६० मीटर कव्हर्ड आहे.
२. बावधन-पाषाण मार्गे वारजे, कात्रज जाणारा रॅम्प क्रमांक ६ हा सुरू झाला आहे.
३. मुळशी मार्गे मुंबईला जाणारा रॅम्प क्रमांक २ सुरू झाला आहे.
४. मुळशीहून कोथरूड, साताराकडे जाणारा रॅम्प १ हा देखील सुरू करण्यात आला.
५. कोथरूडहून बावधनला जाणारा रॅम्प क्रमांक ७ चे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. झालेल्या रस्त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे.
६. वेद विहारहून एनडीएकडे जाणारा रस्ता पूर्ण झाला आहे.
७. कोथरूडहून मुंबईला जाणारा सेवा रस्तावरून वाहतूक सुरू झाली आहे.

हे काम सुरू :
- चांदणी चौकातील एनडीए चौक ते बावधन ला जोडणाऱ्या १५० मीटर लांबीच्या पुलाचे काम अजूनही सुरूच आहे.
- १५० मीटर लांबीच्या व ३२ मीटर रुंदीच्या पुलासाठी एकूण २२ खांब उभारले जात आहे.
- २२ पैकी बावधनच्या बाजूचे १० खांब उभारले गेले आहे.
- एनडीएच्या बाजूचे १२ खांब उभारण्याचे काम सुरू.
- रॅम्प ३ व रॅम्प ७ चे २० टक्के काम अपूर्ण आहे.

चांदणी चौक रस्ते प्रकल्पातील सुमारे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे. २५ मे पासून गर्डर टाकण्याचे काम सुरू होईल. २५ जुलैपर्यत चांदणी चौक येथील काम पूर्ण होईल.
- संजय कदम, प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे