SPPU Chowk
SPPU Chowk Tendernama
पुणे

Pune : विद्यापीठ चौकातील कोंडी कमी कशी होणार? असा आहे नवा पर्याय?

टेंडरनामा ब्युरो

पुणे (Pune) : कृषी महाविद्यालयातील जुन्या रस्त्याने रेंजहिल्स, बोपोडी, खडकीकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता दिल्यास विद्यार्थ्यांसह विविध घटकांवर परिणाम होऊ शकतो, हे लक्षात घेत पर्यायी रस्त्यासाठीचा पूर्वी सुचविलेला पर्याय नाकारला आहे. आता महामेट्रो व कृषी महाविद्यालयाच्या सीमाभींतीजवळून जाणारा दुसरा नवीन पर्यायी रस्ता सुचविला आहे. हा रस्ता लवकर तयार करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला.

गणेशखिंड रस्त्यासह आनंद ऋषीजी महाराज चौक (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौक) येथील बहुमजली उड्डाणपूल, मेट्रो प्रकल्प व रस्ता रुंदीकरणामुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. याची दखल घेऊन पालकमंत्री अजित पवार यांनी जानेवारीत बैठक घेतली होती.

त्यावेळी वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी खडकी, बोपोडी, रेंजहिल्स परिसरात जाणाऱ्या दुचाकी, मोटारींसाठी कृषी महाविद्यालयातील रस्त्याचा पर्यायी रस्ता म्हणून वापर करण्यास परवानगी देण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या होत्या. मात्र कृषी महाविद्यालयातील म्हसोबा गेट ते सिंचननगर, तेथून खडकी, बोपोडी (स्पायसर महाविद्यालय रस्ता) येथे जाण्यासाठी रस्ता सुरू झाल्यास विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण वर्ग, शेती, प्रात्यक्षिक क्षेत्र अशा सगळ्यांनाच रहदारीचा मोठा फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त केली होती.

दुसरा पर्याय कशामुळे?

पालकमंत्री अजित पवार यांनी पुन्हा विविध विभागांची बैठक घेतली. यासाठी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) प्रमुख राहुल महिवाल, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत कृषी महाविद्यालयातील पर्यायी रस्त्याबाबत चर्चा झाली. त्यावेळी कृषी महाविद्यालयावर होणारे परिणाम लक्षात घेऊन पर्यायी रस्त्यासाठी दुसरा पर्याय सुचविला होता. त्यानुसार कृषी महाविद्यालय व महामेट्रो यांच्यातील सीमाभिंतीच्या जवळून जाणारा नवीन रस्ता करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती ‘पीएमआरडीए’च्या अधिकाऱ्यांनी दिली.

दोन महिने वाट पाहावी लागणार

कृषी महाविद्यालयातील जुन्या रस्त्याऐवजी नवीन रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र सध्या तेथे मोकळी जागा आहे. त्यावर पूर्णपणे नवीन रस्ता करावा लागणार आहे. त्यासाठी दीड ते दोन महिने लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांना आणखी दोन महिने गणेशखिंड रस्त्यावरील वाहतुकीची समस्या सहन करावी लागण्याची चिन्हे आहेत.